प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात उपचार घेणाऱया कोरोना संशयितांबरोबर चर्चा करून त्या चर्चेची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी कणबर्गी येथील एका युवकाला सोमवारी अटक केली आहे.
अमीर ऊर्फ हामजा महंमदयासीन बिडीकर (वय 30, रा. सिद्धेश्वरनगर, कणबर्गी) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी हामजाला अटक केली.
त्याच्यावर भादंवि 153 (ए), 188, 504, 505(1), सहकलम 34 अन्वये सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी स्वतः फिर्याद दिली होती. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 13 मिनिटे 11 सेकंदांचा ऑडिओ व्हायरल करण्यात आला होता. या संभाषणात जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात व्यवस्थित सोयीसुविधा नाहीत. ज्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना संशयितांबरोबर एकत्रित ठेवण्यात आले, जिल्हाधिकारी असताना पालकमंत्र्यांनी कोरोना पॉझिटिव्हची घोषणा का केली? असे सांगत संपूर्ण व्यवस्थेबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.
ही गोष्ट जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांच्याशी चर्चा करून एफआयआर दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार एफआयआर दाखल करून एपीएमसी पोलिसांनी हामजाचा शोध घेतला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सुरक्षित अंतरावरून चौकशी
हामजाला पोलीस स्थानकात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून पोलिसांनी एकंदर घटनेविषयी त्याच्याकडून माहिती घेतली. आपणच हे संभाषण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. एका मित्राला ते पाठविले होते. ऐकून डिलिट करणार असल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, त्याने ते व्हायरल केल्याचे हामजाने पोलीस अधिकाऱयांना सांगितले.









