प्रतिनिधी/ वास्को
वाढीव वीज बील प्रश्नी काँग्रेसने काल शुक्रवारी वास्कोतून पुन्हा आंदोलन सुरू केले. शांततेत या आंदोलनाला सुरवात झाली. मात्र, पोलिसांनी वीजमंत्री निलेश काब्राल यांचा प्रतिकात्मक पुतळा जप्त केल्याने या आंदोलनाला शेवटच्या क्षणी वेगळे वळण लागले. पोलिसांच्या या कृत्त्याचा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. राजकीय दबावाखालीच पोलिसांनी सरकारविरोधी उद्रेक दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमोणकर यांनी केला आहे.
मागचे दोन महिने वाढीव वीज बील प्रश्नी गोवाभर आंदोलन करूनही सरकारने जनतेच्या मागणीची दखल घेतलेली नाही. उलट सरकारने लोकांची फसवणुक करून जखमेवर मिठ चोळलेले आहे. याचा निषेध व आंदोलनाला पुन्हा सुरवात करण्याचा कार्यक्रम घेऊन नगरसेविका श्रध्दा आमोणकर, माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर, मुरगाव गट काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मुरगाव, वास्को व अन्य काही भागातील काँग्रेस कार्यकर्ते शुकवारी दुपारी 12 वा. वास्कोतील विद्युत भवनासमोर जमले होते. या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत वीजमंत्री निलेश काब्राल यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून आणला होता. वीजमंत्र्याचा निषेध म्हणून या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम वास्कोतूनच वाढीव वीज बील प्रश्नी आंदोलनाला सुरवात झाली होती. सरकारने मागणीची दखल न घेतल्याने दुसऱया टप्प्यातील आंदोलनाला वास्कोतून सुरवात करण्यात आल्याचे सांगून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पुन्हा एकदा वीज खात्याच्या साहाय्यक अभियंत्यांची भेट घेऊन या आंदोलनाची प्रथमपासूनची माहिती दिली. गोवाभर वीज बील प्रश्नी आंदोलन होऊनही सरकारने जनतेला वीज बीलात सुट दिलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करावे लागत असल्याचे स्पष्ट करून आमोणकर यांनी सदर अभियत्यांना निवेदन सादर केले व सरकारने आता तरी जनतेच्या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमोणकर यंनी सरकार जनतेच्या आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्यांची फसवणुक करीत असल्याचा आरोप करून सरकारच्या बेपर्वाई वृत्तीचा निषेध केला.
वीजमंत्री निलेश काब्राल यांनी वाढीव वीज बीलाच्या प्रश्नावर कुठेही चर्चा करण्यास तयार असल्याचे बोलले होते. त्यामुळे आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना वास्कोत या क्षणी येऊन जनतेबरोबर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, मंत्र्यांनी आपले शब्द फिरवलेले असून वास्कोत येऊन चर्चा करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेच्या साथीने त्यांचा निषेध करीत असल्याचे आमोणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
दहनापूर्वीच प्रतिकात्मक पुतळा उचलला
काँग्रेस कार्यकर्त्यांनी दहन करून निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत आणलेला मंत्री निलेश काब्राल यांचा प्रतिकात्मक पुतळा बराच वेळ वास्कोतील विद्यत भवनासमोर होता. मात्र, दहन करण्याची वेळ येताच वास्को पोलिसांनी हा पुतळा आंदोलकांमधून जप्त केला. त्यामुळे या निषेध आंदोलनाला वेगळे वळण लागले. बरेच पोलीस घटनास्थळी होते. पुतळा पोलिसांनी उचलताच संकल्प आमोणकर व पोलिसांमध्ये वादावादी झाली. वातावरण तापल्याने पोलीस निरीक्षक निलेश राणेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शारीरीक अंतर पाळण्याचे आवाहन करीत कार्यकर्त्यांना पिटाळण्यास सुरवात केली. मात्र, पोलिसांनी तो पुतळा कार्यकर्त्यांच्या हाती देण्याचे टाळले. त्यामुळे कार्यकर्त्यांना तोंडी निषेधावरच समाधान मानावे लागले. कोविड संसर्गासंबंधीत शारीरीक अंतराच्या नियमांचा भंग तसेच सुरक्षेच्या कारणास्त विद्युतभवनसमोर पुतळय़ाचे दहन करण्यास आक्षेप घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. तर संकल्प आमोणकर यांनी वास्कोतच असे प्रश्न उपस्थित होत असतात. गोव्यात पणजीसह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी अगदी विद्युतभवनासमोर आणि पेट्रोल पंपाजवळही प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. पोलिसांनी कोणताच आक्षेप घेतला नाही. वास्को मुरगावात केवळ राजकीय दबावापोटी पोलिसांना अशा प्रकारे वागावे लागत असून वेळोवेळी असेच घडलेले आहे. नियम केवळ वास्को मुरगावातच लागत असतात असे स्पष्ट करून आमोणकर यांनी लोकांचा आवाज दाबण्याच्या राजकीय कृतीचा निषेध केला. चतुर्थीनंतर वीज बील प्रश्नी पुन्हा आंदोलन होत राहिल असे आमोणकर यांनी म्हटले आहे.









