क्राईम रोखण्यासाठी गोल्डन आवर योजना अंमलात
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यामध्ये सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. केवळ जनताच नाही तर सरकारही भरडले गेले आहे. बऱयाच सरकारी वेबसाईट हॅक करून पैसे लाटण्याचे प्रकारही घडले आहेत. तेव्हा याबाबत सरकारने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य मुनिराजू यांनी केली.
यावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी राज्यात गोल्डन आवर ही योजना राबविली गेली. त्यामुळे देशात सर्वात जास्त गुन्हय़ांचा तपास आमच्या पोलीस विभागानेच केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी तसेच फसवणूक झालेल्यांसाठी 112 हा क्रमांकदेखील सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हय़ामध्ये सायबर क्राईम पोलीस स्थानकाची स्थापनाही केली आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्यास बऱयाच प्रमाणात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत वारंवार जनजागृती केली गेली आहे. तरीदेखील सर्वसामान्य जनता फसत आहे. हे दुर्दैव आहे. एका क्षणात कोटी रुपये जात आहेत. त्याबाबत पुन्हा पुन्हा आम्ही जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. झारखंड येथील जामतारा तसेच बिहार, उत्तराखंड यासह देशातील गुन्हेगार अशाप्रकारे वेबसाईट हॅक किंवा ऑनलाईनद्वारे फसवणूक करत आहेत. तरीदेखील पोलिसांनी आतापर्यंत 70 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्याप्रकरणी गुन्हेगारांना अटकही केली आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.
सभापती बसवराज होरट्टी यांनीही यावेळी गृहमंत्र्यांना अधिकाधिक जनजागृती करा, फसवणूक होवू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल, याचे विवेचन करा, त्यामुळे असे गुन्हे होणार नाहीत. तेव्हा गृहविभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.









