किरकोळ भाजीपाला बाजारात नागरिकांची वर्दळ मंदावली
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उष्माबरोबर बाजारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदमुळे शासकीय सुटी होती. याचा परिणाम किरकोळ भाजीपाला बाजारावर झाला. बाजारात वांगी आणि टोमॅटोचे दर घसरले आहेत. तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात वांगी 60 रु. किलो, ओलिमिरची 60 रु. किलो, भेंडी 50 रु. किलो, काकडी 50 रु. किलो, गाजर 50रु. किलो, ढबू 50रु. किलो, बिन्स 60रु. किलो, टोमॅटो 15रु. किलो, कारली 50रु. किलो, बटाटा 30रु. किलो, फ्लॉवर 20 रुपयाला एक, कोबी 10 रुपयाला एक, शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला एक पेंडी, कोथिंबीर 15 रुपये एक पेंडी, कांदा पात 20 रुपयाला 5पेंड्या, लाल भाजी 10 रुपयाला दोन पेंड्या, पालक 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन पेंड्या, मेथी 15 रुपयाला एक पेंडी असा भाजीपाल्याचा दर आहे.
मागील काही दिवसापासून वांगी आणि टोमॅटोचे दर इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत घसरले आहेत. इतर भाजीपाल्यांचा दर स्थिर आहे. वाढत्या उन्हामुळे काकडी, गाजर, दुधीभोपळा आणि हिरव्या पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे हिरव्या भाज्यांनाच अधिक पसंती दिली जात आहे. कडधान्य आणि किराणा मालाचे दर देखील भरमसाठ वाढले आहेत. डाळीचे दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.
लिंबुंची चलती
बाजारात लिंबुंची आवक दिसून येत आहे. मात्र एका लिंबूची किंमत 7 रुपये झाले आहे. त्यामुळे लिंबू खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दोन तीन रुपयाला मिळणारा लिंबू सात रुपये झाला आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्यातदेखील सर्वसामान्यांना लिंबू दराने हैराण केले आहे.









