सह्याद्री ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमच्या जवानांनी मृतदेह शोधला
प्रतिनिधी/ वाई
येथील रामडोहात सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पोहताना विकास सदाशिव वैराट (वय 30) हा बुडाल्याचे त्याच्यासोबत पोहत असलेल्या मित्रांनी विकासच्या कुटुंबियांना सांगितले. लगेच पोलीस रामडोहाच्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी सह्याद्री ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई येथील काही युवक सोमवारी सकाळी रामडोह आळी येथील कृष्णा नदीच्या पात्रातील रामडोहात पोहायला गेले होते. पोहता पोहता त्यांच्यातील विकास वैराट हा बुडाल्याचे इतर मित्रांना माहिती पडले. त्यांनी लगेच त्याचा शोध घेतला. परंतु त्यांना यश आले नाही. त्यांनी लगेच त्याच्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली. कुटुंबिय तत्काळ तेथे पोहोचले. वाई पोलिसांना याची माहिती मिळताच तेही तेथे पोहोचले. डोहात बुडालेल्या युवकास बाहेर काढण्यासाठी सहय़ाद्री टेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्या डोहात तब्बल दोन तास शोध मोहिम राबवण्यात आल्यानंतर सायंकाळी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह पाहून वैराट कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. या शोधमोहिमेत सुनील भाटीया, अनिल केळघणे, अनिकेत वाघदरे, अनिल लांगी, आशिष बिरामणे, तेजस जवळ, सौरभ गोळे, गौरव सालेकर, अक्षय नाविलकर, रोहन कांबळे यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, काठावर त्याच्या चप्पला, कपडे तसेच होते.
डोहात अनेकांचा बुडून मृत्यू
रामडोहात यापूर्वी दर चार ते पाच वर्षानंतर कोणाचा ना कोणाचा तरी बुडून मृत्यू होतो. पोहायला गेले की तेथे असलेल्या खडकाच्या विवरात अकडून मृत्यू होत असल्याच्या चर्चांना यावेळी बघ्यांमध्ये सुरु होत्या.








