प्रतिनिधी / वाई
वाई तालुक्याच्या चारी बाजुने सहयाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वाई सारख्या दक्षीण काशीचे शहर वसलेले आहे. या डोंगररांगांमध्ये गेले पंधरा दिवसांपासून डोंगर पायथ्यांशेजारी राहणार्या गावातीलच अज्ञात इसमांकडून वाई तालुक्यातील डोंगररांगांना मोठया प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू झाल्याने येथील वनसंपदा, आर्युवैदिक संपत्ती, पक्षांची घरे, सरपटणारे प्राणी आणि पक्षांची अंडी हे जळून खाक होताना दिसत आहेत.
आधिच वाई, आणि भुईंज येथील वनविभागाच्या कर्मचार्यांकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अज्ञातांनी लावलेल्या या आगी विझविताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. तरी वाई तालुक्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निष्ठूर व धाडसी भूमिका घेवून. माणुसकीला तिलांजली देवून कायद्याच्या चाबकाचा वापर करून वनवा लावणार्यांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे, अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेने केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून वाई तालुक्यातील वन विभागाने वनवे लावू नयेत यासाठी गावोगावी जनजागृती सप्ताह राबविले. त्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात जंगलाबाबत आस्था निर्माण झाली होती. आणि अनेक गावांतील तरुण वर्ग वनवा रोखण्यासाठी पुढे येताना दिसत होते. अनेक गावांचे सरपंच, पोलीस पाटील वनवा लागल्याची वन कर्मचार्यांनी दिलेली हारोळी, व ती विझविण्यासाठी गावोगावच्या वनसमित्या, पोलीस पाटील, सरपंच व तरुण वर्ग असा ताफा वनवा लागलेल्या डोंगरांवर जावून हातात डहाळयांची छकाटी घेवून भर उन्हात. प्राणाची बाजी लावून विझवताना दिसत आहे.
एकत्र येवून वनवे लावणार्या दुष्ट प्रवृत्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी गावोगावी पुढाकार घेतला जाईल का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागाचा असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतुनेच हे वनवे लावले जात असल्याने याचा त्रास वन कर्मचार्यांना होताना दिसत आहे. डोंगररांगांवर असणारा हा गवताचा चारा पायथ्याशी असणार्या गावातीलच जणावरांसाठी याचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. हा चारा जळून खाक झाल्यानंतर गावातील जनावरे कोठे जातील याचा विचार कोणीच करताना दिसत नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील अनेक डोंगरांना जाणीवपूर्वक आगी लावल्या जात आहेत. हा प्रकार योग्य नसून त्याचा तपास करण्याची वेळ वनविभागाच्या अधिकार्यांवरही येवून पडली आहे. वनविभागानेही अशा लोकांचा शोध घेवून त्यांना तात्काळ गजाआड करावे अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे. काल दि. 12 रोजी महाबळेश्वर तालुक्यातील एका इसमाचा वनवा विझविताना होरपळून मृत्यू झाल्याची नोंद महाबळेश्वर येथील पोलीस ठाण्यात झाली आहे.









