इचलकरंजी / प्रतिनिधी:
वस्त्रनगरीतील यशस्वी उद्योजक, लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते, व्यंकटेश सहकारी सूत गिरणीचे संस्थापक मल्लय्या दत्तात्रय स्वामी यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. यंत्रमाग कामगारांना मालक बनविणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
मल्लय्या स्वामी हे दादा नांवाने परिचित होते. आमदार कै. बाबासाहेब खंजिरे यांच्या नेतृत्त्वाखाली राजकारण व सहकार क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला. व्यंकटेश सहकारी सूत गिरणी उभारण्यात मल्लय्या स्वामी यांचा मोलाचा वाटा आहे. याठिकाणच्या ‘व्यंकटेश’ ब्रॅण्डने बाजारपेठा काबिज केल्या. देशभक्त कै. रत्नाप्पाण्णा कुंभार, खासदार कै. बाळासाहेब माने यांच्या विचारांनी त्यांची वाटचाल सुरु होती. यंत्रमागधारकांची मातृसंस्था असलेल्या इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष असताना दादांनी शहरातील अनेक कामगारांना यंत्रमागधारक बनविले. त्यांनी वीरशैव सहकारी बँकेचे चेअरमन, लिंगायत समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज सिव्हीक बॉडीचे अध्यक्ष, वरदविनायक मंदिर मंडळाचे अध्यक्ष आदी पदे भूषविली. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक जाणते व्यक्तिमत्व हरपले आहे. राजकारणाबरोबर समाजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटविला. पंचगंगा नदीघाटावरील वरदविनायक मंदिरात त्यांच्याच नेतृत्त्वाखाली उभारण्यात आले.
येथील लिंगायत रुद्रभूमीमध्ये मल्लय्या स्वामी यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर, रवि माने, महादेव गौड, संभाजी नाईक, प्रकाश मोरबाळे, वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापुरे, सुर्यकांत पाटील बुदीहाळकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक उपस्थित होते. मल्लय्या स्वामी यांच्या पश्चात राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वीरशैव बँकेचे संचालक अनिल स्वामी व कारखानदार सुनिल स्वामी अशी तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांचे सासरे होत.