जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे नामकरण
वृत्तसंस्था/ गाझियाबाद
शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म त्यागून सोमवारी हिंदू धर्म स्वीकारला आहे. गाझियाबाद येथील डासना मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत. रिझवी आता त्यागी समुदायाशी जोडले जातील, त्यांचे नाव आता जितेंद्र नारायण सिंह त्यागी असणार असल्याचे यति नरसिंहानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
हा धर्मांतराचा प्रकार नाही. मला इस्लाम धर्मातून काढून टाकण्यात आले होते. अशा स्थितीत कुठला धर्म स्वीकारावा हा माझा विषय आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वात पहिला धर्म आहे. हिंदू धर्मात अनेक चांगल्या गोष्टी असून माणुसकीने ओतप्रोत भरलेला हा धर्म आहे. माझ्या हत्येसाठी दर शुक्रवारी इनामाची रक्कम वाढविली जात असल्याने मी आज सनातन धर्म स्वीकारत असल्याचे रिझवी यांनी म्हटले आहे.

शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे माजी अध्यक्ष रिझवी यांनी यापूर्वीच इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती. रिझवी हे स्वतःच्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी रिझवी यांनी मृत्युपत्र लिहून मृत्युमुखी पडल्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे म्हटले होते.
माझ्या हत्येचा आणि गळा चिरण्याचा कट रचला जातोय. मुस्लीम मला मारू इच्छित आहेत. कुठल्याच कब्रस्तानात स्थान देणार नसल्याची घोषणा मुस्लिमांकडून करण्यात आली आहे. याचमुळे माझ्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे रिझवी यांनी म्हटले होते.









