प्रतिनिधी / सातारा :
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह तयार असून येत्या 15 ऑगस्टला त्यांचा उद्घाटन सोहळा होईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, अद्याप शासनस्तरावर कोणताही माहिती आलेली नाही, असे समाज कल्याण अधिकारी नितीन ओबाळे यांनी दिली.
राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यासाठी 23 ठिकाणी वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 14 ठिकाणी वसतीगृहासाठी इमारती तयार आहेत. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतीगृहांचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे येत्या 15 ऑगस्ट रोजी वसतीगृह सुरू होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. परंतु समाज कल्याण विभागाकडे अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) विभागीय केंद्र व जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीमान करण्यात आली आहे. ‘सारथी’ मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग, संस्थेसाठी मनुष्यबळ पुरविणे, तारादुत प्रकल्प सुरू करणे, टॅलेंट सर्च परीक्षा व इयत्ता नववी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या नवीन योजना सुरू करणे संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कोणतेही निर्देश नाहीत
सारथी संस्थेचे काम हे नियोजन विभाग पाहत आहे. त्या संस्थेसाठी समाज कल्याणकडे बहुजन कल्याणकडे निधी नव्हता. त्यामुळे नियोजन विभागाकडे घेवून त्यांचा कार्यभार सुरू आहे. तरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठी वसतीगृह काढायची झाली. तरी कोणत्या विभागाने ती चालवायची यांचे कोणतेच निर्देश नाहीत.
– नितीन ओबाळे, समाज कल्याण अधिकारी









