जीवनावश्यक वस्तूंसह दागिनेही जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान
मंडणगड/ प्रतिनिधी
तालुक्यातील वलौते येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाडावजा घरास लागलेल्या आगीत बांधून ठेवलेली पाच गुरे मृत्युमुखी पडली. याचबरोबर घरातील जीवनावश्यक वस्तूंसह दागिने, रोख रक्कम व कपडे जळून खाक झाले. यात एकूण 4 लाख 45 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेसंदर्भात तहसील कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वलौते येथील गयासुद्दीन महमंद करेल यांच्या गोठय़ात तिडे-आदिवासीवाडीतील पांडुरंग हिलम वास्तव्य करुन आपली उपजीविका चालवत होते. शुक्रवारी संपूर्ण कुटुंब वाडय़ाबाहेर गेले होते. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या अपघतात वाडय़ात बांधून ठेवलेली 1 गाभण गाय, 3 दुभत्या गाई, 1 पाडा यांची जीवितहानी झाली आहे. तसेच पंचनाम्यानुसार वाडय़ातील 1700 रुपये किंमतीचे गवत, 12000 रुपये किंमतीचे सव्वादोन खंडी भात, 15000 रुपये किंमतीचे तांदुळ, 1 लाख रुपये किंमतीचे पत्नीचे मंगळसूत्र, 32000 रुपये किंमतीच्या दोन कानातल्या कुडय़ा, 5 हजार रुपये किंमतीची भांडी, कपडे व कलिंगडाच्या विक्रीतून मिळालेली 50 हजार रुपयांची रोख रक्कम, 95 हजार रुपये किंमतीची पाळीव जनावरे असे एकूण 3 लाख 10 हजार 700 रुपयांचे वाडय़ात राहणाऱया पांडुरंग हिलम यांचे नुकसान झाले आहे.
तसेच या वाडय़ाचे मुळ मालक गयसुद्दी महंमद करेल यांचे वाडय़ासाठी वापरलेले 15 हजार रुपये किंमतीचे 100 वासे, 25 हजार रुपये किंमतीचे 20 भाले, 5 हजार रुपये किंमतीची इंदराठी, 15 हजार रुपये किंमतीच्या रिपा, 24 हजार रुपये किंमतीचे चौकटीसह चार दरवाजे, 8 हजार रुपये किंमतीच्या चौकटीसह आठ खिडक्या, 38 हजार रुपये किंमतीची कौले, 5200 रुपये किंमतीचे कोने असे एकूण 1 लाख 35 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस पाटील हिलम यांनी याबाबत तहसील कार्यालयात खबर दिली असून तलाठी एस. एन. गावकर यांनी पंचनामा केला आहे.









