तिरंदाज दीपिका कुमारी-अतानू दास मंगळवारी बोहल्यावर चढणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लग्नसोहळा म्हणजे सनईचे सूर आले, बँडबाजा आला आणि उंची पेहरावातील वरातीत नाचणारे हौसे-गवसे-नवसेही आले. कोव्हिड-19 नंतर अशा लग्नसोहळय़ातील उत्साह तसूभर कमी होईल किंवा होणारही नाही. पण, काही बाबी मात्र प्रकर्षाने पाळाव्या लागतील. त्या म्हणजे मास्क, सॅनिटायझर्स व सोशल डिस्टन्सिंग!
येत्या मंगळवारी (दि. 30 जून) भारताचे दोन अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी व अतानू दास हे रांचीतील मोराबादी येथे विवाहबद्ध होतील, त्यावेळी तो अर्थातच अनोखा सोहळा असेल, कारण, यात पाहुण्यांचे स्वागत होईल ते मास्क आणि सॅनिटायझर देऊन व त्यांच्याकडून अपेक्षा असेल ती सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची!
दीपिका व अतानू यांची छोटेखानी पत्रिका देखील अनोखी आहे, याचे कारण म्हणजे त्यात पाहुण्यांसाठी 19 मार्गदर्शक सूचना आहेत.
‘पाहुण्यांना त्यांच्या स्वागताप्रसंगी मास्क व सॅनिटायजर दिले जाईल. आम्ही या सोहळय़ाची वेगळी तयारी केली आहे. मोठा बॅन्केट हॉल आरक्षित केला आहे, जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंग पाळणे अतिशय सोयीचे होईल. आम्ही स्वतः कशालाही स्पर्श करणार नाही. आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छितो आणि स्वागत सोहळय़ात हजर असणाऱया प्रत्येकाची सुरक्षितता आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे’, असे दीपिका व अतानू यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.
या नियोजित वरवधूंनी फक्त 60 निमंत्रणपत्रिकांची छपाई करवून घेतली असून स्वागत सोहळय़ासाठी पाहुण्यांना दोन सत्रात स्वतंत्रपणे येण्याची सूचना केली आहे. पहिल्या सत्रात 5.30 ते 7 या वेळेत 50 पाहुण्यांना तर त्यानंतर दुसऱया सत्रात आणखी 50 पाहुण्यांना येण्याची वेळ ठरवून दिली आहे. आश्चर्य म्हणजे हे पाहुणे दोन सत्रात येऊन जाईतोवर दीपिका कुमारी व अतानू दास यांचे कुटुंबिय मात्र आपल्या घरीच थांबणार आहेत.
अर्जुन मुंडा मुख्य निमंत्रित
झारखंडचे माजी मुख्यमंत्री व भारतीय तिरंदाजी संघटनेचे नवनिर्वाचित अर्जुन मुंडा हे या छोटेखानी विवाह सोहळय़ाला हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. दीपिका कुमारीने जागतिक मानांकन यादीत अव्वलस्थानापर्यंत झेप घेतली, त्यात अर्जुन मुंडा यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
‘लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद होते. आम्ही सर्व कुटुंबिय या कालावधीत काहीच करत नव्हतो. कोणत्या तरी एका वेळी विवाहबद्ध होणारच होतो. तो सोहळा आम्ही आता निश्चित केला आहे’, असे दीपिका याप्रसंगी म्हणाली. ातिने याच महिन्यात 26 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
दीपिका सध्या सलग तिसऱया ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे. दीपिकाच्या दमदार योगदानामुळेच भारताने ऑलिम्पिक कोटा निश्चित केला. कॉन्टिनेन्टल ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून भारताने आपले टोकियो तिकीट निश्चित केले. भारताला यानंतर सांघिक कोटा मिळवण्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करता येईल.
दुसरीकडे, अतानू दासचा भारतीय पुरुष संघात समावेश असून 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या रौप्यपदकासह भारतीय संघाचे टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे. तूर्तास, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली आहे. अतानू दास या निमित्ताने सलग दुसऱयांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे.
कोट्स
‘आम्ही अगदी निमंत्रितांना, अति महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केले आहे व त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली. इतर निमंत्रितांना आम्ही फक्त फोनवरुनच निमंत्रण दिले. आमचे कोणतेही मित्र, सहकारी व माध्यमातील प्रतिनिधींना आम्ही या सोहळय़ाचे निमंत्रण दिलेले नाही’.
-नववधू दीपिका कुमारी









