सेवाभावी संस्थांची लाभतेय साथ
चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
कोरोना संसर्गाचे भयानक संकट पुढे ठाकल्यानंतर देशभर हाय अर्लट जारी झाला. केंद्र सरकारने धोका ओळखत उशिरा का होईना पण लॉकडाऊन सुरु केला. मात्र, या सर्वांमध्ये केंद्रीभूत होता पोलीस. कारण आरोग्य विभागाची लढाई आत आहे तर पोलिसांची लढाई आपल्याच माणसांशी सुरु झाली होती. मात्र, पोलिसांनी वापरलेली दांडकीच लॉकडाऊनसाठी उपयोगी ठरली असल्याचे सुजाण नागरिकांचे मत आहे. त्यानंतर गेल्या 20 ते 22 दिवसांपासून रस्त्यावर असलेल्या पोलिसांनी मात्र काही मुर्ख नागरिकांच्या रोषाबरोबरच अनेक त्रासांना सामोरे जात राष्ट्रीय कर्तव्य बजवावे लागत आहे. तापमानात प्रचंड वाढ होत असून त्यातच वर्दीवरील काळे बूट पोलीस बांधवांचा घाम काढत आहेत त्यांना पेट्रोलिंगवरील कॅनव्हॉस बूट वापरण्याची मुभा देण्याची गरज आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून कधी लाठी तर कधी प्रबोधन तर चक्क गाण्यातून नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य पोलीस दादा समजावून सांगत आहेत. वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत रस्त्यावर माणसे येवू नयेत. सामाजिक संपर्क, गर्दी टाळली जावी आणि कोरोनाची संसर्ग साखळी तुटावी यासाठी स्वतःच्या कुटुंबाची काळजी सोडून रात्रंदिवस जीवापाड मेहनत करत करत असलेल्या पोलीस बांधवांना सारा समाज सलाम करत आहे. अगदी जिल्हा पोलीस अधिक्षकांपासून ते पोलीस शिपाई नावाच्या माणसांची सुरु असलेली अनोखी लढाई निश्चितपणे इतिहासात नोंद होईल.
हेच पोलीस दादा रस्त्यावर दिवसरात्र बंदोबस्त करु लागल्यावर अनेक सामाजिक संस्था त्यांना भोजन, पाणी, चहा पुरवण्याचे काम करु लागल्या आहेत. मात्र या संस्थांच्या कामात किती दिवस सातत्य राहू शकेल. त्यामुळे कधी कधी हा पोलीस दादा कोणीतरी दिलेल्या पाण्यावर देखील दिवस ढकलतो आणि आपली 12-12 तासांची डय़ुटी न कुरकरता आहे. साताऱयात सध्या पूर्ण नाकेबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅरिकेटस लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये काहींना दिवसा व काहींना रात्रीची डयुटी देण्यात आली आहे. रस्त्यावर कोणी येवू नये याबरोबरच राष्ट्रीय संपत्तीची काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अत्यावश्यक सोडल्यास सर्वजण घरात बसून आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागलाय. साताऱयासह जिल्हाभरात भर उन्हात पोलीस बंदोबस्त करताना पोलिसांना काही गोष्टींचा त्रासही होत आहे. वर्दी तर अंगावर घालावीच लागणार आहे पण त्यासोबत असलेला खात्याचा कातडी काळा बूट भर उन्हात पोलिसांचा घाम काढत आहे. त्यामुळे उन्हात डय़ुटी करत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना पेट्रोलिंगवर असतानाचे कॅनव्हॉस बूट वापरण्याची मुभा देण्याची गरज आहे.
प्रशासनाने पाण्याची सुविधा द्यावी
पोलीस बांधव रस्त्यावर सर्वांची काळजी घेण्यासाठी उभे असल्याने सामाजिक बांधिलकीतून अनेकजण जेवणाबरोबरच, चहा, पाण्याची सोय करत आहेत. मात्र, हे सर्व आले तर असा बेभरवशी काम आहे. त्यामुळे भरउन्हात डय़ुटी करणाऱया पोलीस बांधवांना जिल्हा प्रशासनाने बंदोबस्तच्या जागी पाण्याचे थंडगार जार व ग्लास पुरवण्याची गरज आहे. डय़ुटीतील 12 तासांमध्ये अनेक मुर्ख नागरिकांच्या तोंडी लागण्यातही कर्मचाऱयांचा बराच वेळ जातो. अशा नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवण्याची थोडी मुभा देण्याची गरज सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मदत करणाऱयांनी नियोजन करावे
राष्ट्रीय आपत्तीत काम करत असलेल्या पोलीस बांधवांचे समाजावर असलेले ऋण मोठे आहेत. याची जाणीव असल्यानेच अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती त्यांना रस्त्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचून नाष्टा, चहा, पाणी देत असल्या तरी हे सर्व बंदोबस्तावरील सगळय़ा पोलीस कर्मचाऱयांपर्यंत पोहोचण्यासाठी या संस्था, व्यक्तींनी एकमेकांशी सलग्न राहून सर्वांनाच या बाबी कशा पोहोचवतील यासाठी नियोजन केल्यास पोलीस कर्मचाऱयांचा उत्साह वाढत राहील. कारण सध्या तेच रस्त्यावरची लढाई लढून कोरोनाला हरवण्यासाठी चांगले काम करत आहेत.
सैन्याला हरवू नका, अन्यथा सर्वजण हरु
संचारबंदी यशस्वी झाली तरच कोरोना संसर्गाची साखळी तुटेल. जे बाधित समोर येतील त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोग्य विभाग त्यांची लढाई लढत आहे. या एकूण पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक पाळण्याशिवाय काहीही पर्याय शिल्लक नसताना पोलीस बांधवांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध सर्व समाजातून होत आहे. कोरोनाविरुध्दच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या पोलीस नावाच्या सैन्याला हरवू नका, अन्यथा आपण सर्वजण हरु हीच भावना असून बाहेर पडणाऱया नागरिकांनी मुर्खपणा किती टोकापर्यंत करावयाचा याचे भान ठेवावे, असे आवाहन अनेक सुजाण समाजघटकांनी केले आहे.
क्राईमरेट घसरला पण पोलिसांचे काम सुरुच
लॉकडाऊन केल्यामुळे सध्या अनेक चांगले बदल घडू लागलेत. गुन्हय़ांचा आलेख खाली घसरला आहे. कोरोनासारखा खमक्या समोर आल्यामुळे चोरटय़ांसह सारे गुंडपुंड देखील कोरंटाईन झाले असून सध्या किरकोळ चोऱयांपासून मोठय़ा चोऱया, दुचाकी चोऱया, फसवणूक, उगीचच भांडणे, मारामाऱया पार थंडावल्या आहेत. मात्र, त्यामुळे पोलीस बांधवांचे काम कमी झालेले नाही. सर्वजण घरात बसताय मात्र पोलीस दादा आणि आरोग्य विभाग तुमच्या सर्वांसाठी अविरतपणे काम करत आहे. सातारकरांनो, आता लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी करुन त्यांच्या त्यागाला सलाम करुया.








