मनात एक जुनी शंका आहे. अट्टल गुन्हेगार मोठे गंभीर गुन्हे करतात. न्यायालय त्यांना फाशी ठोठावते. गुन्हेगार माफीची याचना करतात. काही प्रसंगी त्यांना फाशीतून माफी मिळते. शिक्षा कमी करून मिळते. पण आपल्यासारखा साधासुधा माणूस वाहन चालवताना चुकून एखादा नियम मोडला जातो. पांढऱया वेषातले वाहतूक पोलीस पकडून दंड ठोठावतात. आपण क्षमेची कितीही याचना केली तरी वाहतूक पोलिसांनी माफ केल्याचे किंवा सोडून दिल्याचे ऐकिवात नाही. त्यांनी सांगितलेला दंड भरावाच लागतो. ते आपल्याला कधी माफ का करीत नाहीत?
पण नुकतीच एक बातमी वाचली. नागपुरात एका रिक्षाचालकाने ‘नो पार्किंग’मध्ये रिक्षा लावली म्हणून नुकतेच वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याला पाचशे रुपये दंड ठोठावला. त्याच्याकडे तितके पैसे नव्हते म्हणून त्याची रिक्षा जप्त केली.
रिक्षाचालक पैसे आणण्यासाठी घरी गेला. घरातही पैसे नव्हते. मग त्याने आपल्या मुलाने पैसे साठवलेली पिगी बँक उघडली. त्यातली चिल्लर काढली. एका रुमालात पाचशे रुपयांची नाणी घेऊन दंड भरण्यासाठी तो पोलिसांच्या कार्यालयात गेला. नाण्यांच्या स्वरूपात दंड भरायला आलेला माणूस पाहून वरि÷ अधिकारी मालवीय यांनी चौकशी केली. त्यांना सगळी हकीकत समजल्यावर वाईट वाटले. त्यांनी स्वतःच्या खिशातून पाचशे रुपये काढून रिक्षाचालकाला दंड भरण्यासाठी दिले आणि बाळाची पिगी बँकेतली रक्कम परत घरी न्यायला सांगितले. वाहिनीने बातमी सविस्तर दिली आहे. मात्र त्या सुदैवी रिक्षाचालकाचे नाव बातमीत दिलेले नाही. ते काही असले तरी अशा सकारात्मक बातम्या वाचल्या की आनंद होतो हे खरेच आहे. बातमीबद्दल वाचलेले एक जुने अवतरण आठवते. कुत्रा माणसाला चावला तर त्यात बातमी नसते. पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. त्याच धर्तीवर असे म्हणायला हवे की सरकारी अधिकारी नागरिकांशी प्रेमाने वागले तर त्यात बातमी नसावी. सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना किंवा नागरिकांशी वाईट वागताना पकडला गेला तर त्याची बातमी व्हावी.
पण दुर्दैवाने सध्या सरकारी अधिकारी चांगले वागतात, माणुसकीचा प्रत्यय देतात तेव्हा ती बातमी मोठी चौकट करून दाखवावी लागते. एरव्ही रोज कुठे ना कुठे कोणाला पैसे खाताना पकडले, एखादा निष्पाप नागरिक चुकून पोलिसांनी पकडला किंवा न्याय मिळाला नाही म्हणून एखाद्या नागरिकाने पोलिसांच्या कचेरीसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला, आत्महत्या केली हेच जास्त वाचायला मिळते.
आपण चांगल्या बातम्यांची वाट बघत राहू.








