बहुचर्चित सोने चोरीप्रकरणी आयजीपी राघवेंद्र सुहाससह चार अधिकाऱयांची चौकशी
प्रतिनिधी /बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सीआयडीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अनेक पोलीस अधिकारी सध्या सीआयडीच्या रडारवर आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे यापूर्वीचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्यासह चार पोलीस अधिकाऱयांची चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
चौकशीला हजर राहण्यासंबंधी सीआयडीने राघवेंद्र सुहास यांना नोटीस दिली होती. पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार, मंडल पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक रमेश पाटील या चारही अधिकाऱयांची बेंगळूर येथील सीआयडी मुख्यालयात जबानी नोंदविण्यात आली आहे. आणखी काही अधिकारी सीआयडीच्या रडारवर आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयजीपी राघवेंद्र सुहास यांच्या समवेत सध्या सीआयडीच्या ताब्यात असलेल्या किरण विरनगौडर याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवरही सीआयडीने चौकशी केली आहे. आपल्याला किरणचा परिचय आहे. मात्र या प्रकरणात आपला काही एक सहभाग नसल्याचे आयजीपींनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
9 जानेवारी 2021 रोजी मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी कार हत्तरगी टोलनाक्मयावर अडविण्यात आली होती. सोने तस्करीच्या संशयावरून यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्या कारमध्ये सोने मिळाले नाही. कार सोडण्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांची मांडवली करण्यात आली होती. किरण विरनगौडर हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे.
किरण विरुद्ध येथील यमकनमर्डी, संकेश्वर, कॅम्प, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकासमोर उभी करण्यात आलेल्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यानंतर आयजीपी राघवेंद्र सुहास यांच्यासह चार अधिकाऱयांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
आज कोठडीची मुदत संपणार
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार किरण विरनगौडर याच्याविरुद्ध येथील कॅम्प पोलीस स्थानकातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जमखंडी (जि. बागलकोट) येथे उघडकीस आलेले दूध पावडर प्रकरण दडपण्यासाठी क्लब रोडवरील एका हॉटेलमध्ये मांडवली करण्यात आली होती. याप्रकरणी किरणसह काही पोलीस अधिकाऱयांवर कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा दिवसांसाठी त्याला कोठडीत घेतले आहे. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपणार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.









