कणकवली / प्रतिनिधी-
वरवडे गावामधील वीजपुरवठा गेले काही दिवस सातत्याने खंडित होत आहे. लाईट गेल्यास वायरमनपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत फोन केल्यास फोन बंद असणे, न उचलणे असे प्रकार सातत्याने घडतात. फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा विषय अद्याप सुटलेला नाही. लो होल्टेजची समस्या कायम आहे, याबाबत तातडीने कार्यवाही करा. यापुढे अशी समस्या उद्भवू लागल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन दिला. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी सातत्याने उद्भवणाऱ्या वीज समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रदीप घाडी, रत्नाकर देसाई, सलाउद्दीन शेख, हनुमंत बोन्द्रे, सादीक कुडाळकर, दशरथ घाडीगांवकर, विजय कदम, विवेक राणे, प्रकाश परब, गोपाळ घाडी, राजू कोदे, दिनेश अपराध, नीलेश सावंत, अनिल घाडी तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. नलावडे उपस्थित होते.
गेले तीन दिवस वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. यापूर्वीही अनेकदा अशा समस्या उद्भवल्या. प्रत्येकवेळी आश्वासनांपलिकडे काहीच होत नाही. मात्र, यापुढे सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा देण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत फणसवाडी येथील ट्रान्सफॉर्मर तातडीने बुधवारी कार्यान्वीत करण्यात येईल. त्यासाठीची कार्यवाही आजपासूनच करण्यात येत असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले. तसेच परबवाडी येथील लो होल्टेजची समस्याही निकाली काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणी झाडी वाढलेली असल्याने त्याबाबतही तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली. याकरीता एक दिवस ठरवा ग्रामस्थ ट्री कटिंगसाठी मदत करतील, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार सोमवार १६ ऑगस्ट रोजी ट्री कटिंग करण्याचे ठरले. यावेळी लाईनसाठीचे स्पेसरही त्याचवेळी बसविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, वायरमनसहीत अधिकाऱ्यांनी फोन चालू ठेवणे, फोन उचलून माहिती देणे, लोकांच्या समस्या जाणून घेणे, याबाबत गांभीर्य दाखविण्याची मागणीही करण्यात आली.