हाय अलर्टः पर्यावरण मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वन्यप्राण्यांमध्येही कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोना संक्रमणामुळे एका सिंहाच्या मृत्यूची पुष्टी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. पण हा मृत्यू कुठे झाला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. वन्यप्राण्यांमध्येही संक्रमणाचा धोका पाहता पन्ना व्याघ्र प्रकल्पात हाय अलर्ट देण्यात आला आहे.
कोरोना कर्फ्यू लावण्यासह 16 एप्रिलपासून पन्ना व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या भ्रमंतीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाघांचे सातत्याने निरीक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी दिली आहे.
वन्यप्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा. तसेच माकड आणि अन्य वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देऊ नका असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱयांना मास्क आणि सॅनिटायजर देण्यात आला आहे. तर नागरी वस्तीत राहणाऱया वन कर्मचाऱयांना संक्रमणापासून बचावासाठी आवश्यक सर्व उपाय करण्याचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.









