चालकांना वाहने चालविणे मुश्कील : डेनेज चेंबर वाहनधारक-प्रवाशांना बनले धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने येळ्ळूर रोडसह वडगाव परिसरातील रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावर आणि अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पादचाऱयांसह वाहनचालकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. डेनेज चेंबर वाहनधारक आणि पादचाऱयांचा जीवघेणे बनले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे कधी बुजविणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील बहुतांश रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण उपनगरातील रस्त्यांच्या विकासांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वडगाव-येळ्ळूर (येळ्ळूर केएलई पर्यंत) रोडची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी एक फुटाहून अधिक मोठे खड्डे असल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. शहापूर पोलीस स्थानक ते येळ्ळूर रोड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्टसिटी योजनेअंर्तगत केले आहे. पण वडगाव परिसरातील मुख्य रस्त्यासह संपर्क रस्त्याच्या नशिबी दगड-माती देखील नाही.
डेनेज चेंबरमध्ये पादचारी पडल्याची घटना
वडगाव परिसरातील विविध रस्त्यावरून वाहनधारकांची गर्दी असते. पण या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून खड्डय़ांमुळे दररोज अपघात घडत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर असलेल्या डेनेज चेंबरची दुरवस्था झाली असून झाकण खराब झाल्याने वाहनधारक, पादचाऱयांना धोका निर्माण झाल आहे. रस्त्याशेजारी असलेल्या डेनेज चेंबरमध्ये पादचारी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खड्डय़ाजवळ अडथळे निर्माण केले आहेत.
रस्त्याचे भाग्य कधी उजळणार ?
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. वास्तविक पाहता हा रस्ता वाहनधारकांना सोयीचा असल्याने रात्रंदिवस वर्दळ असते. तसेच विविध उपनगरे व वसाहती असल्याने नागरिक ये-जा करीत असतात. पण या ठिकाणी असलेले मोठमोठे खड्डे जैसे थे आहेत. परिणामी वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार ? अशी विचारणा परिसरातील रहिवासी करीत आहेत. समस्यांकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.









