टँकरने पाणीपुरवठा : कामगारांनी संप पुकारल्याने नियोजन कोलमडले, सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीपुरवठा विभागाच्या हंगामी कामगारांनी संप पुकारल्याने पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दहा ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरवासियांचे हाल होत आहेत. दररोज लाखो लीटर पाण्याची तहान केवळ हजार लीटरच्या पाण्यावर भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला आहे. त्यामुळे वडगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हंगामी कामगारांनी आंदोलन छेडून पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे दि. 10 जानेवारीपासून शहर व उपनगरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. काही मोजक्मयाच कामगारांना घेवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न महापालिका आणि एलऍण्डटी कंपनीने केला होता. तसेच हंगामी तत्त्वावर व्हॉल्वमॅनची नियुक्ती करून पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र नव्याने दाखल झालेल्या कामगारांना पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच कामगारांनी आपले आंदोलन मागे घेवून कामावर रुजू झाले आहेत.
मात्र कोलमडलेला पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्मय झाले नाही. काही भागात 10 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहर आणि उपनगरात सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी 12 ते 16 एमजीडी पाणीपुरवठा केला जातो. पण सध्या मुबलक पाणीसाठा असूनही कामगारांच्या आंदोलनामुळे सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्मय झाले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासही प्रारंभ करण्यात आला होता. कामगारांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मंगळवारपासून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने काहीभागात अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. विशेषतः वडगाव परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच काही नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठी अडचण झाली असून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









