वाढलेले वजन हे आरोग्यासाठी त्रासदायक असते. अनेक व्याधींच्या शिरकावासाठी ते कारणीभूत ठरते. विशेषतः उन्हाळा येऊ लागला की वजनवाढीचा त्रास अधिक जाणवू लागतो. वास्तविक, काही योगासने आपल्याला वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
- संतुलनासन : योगासनासाठी मॅटवर पोटावर झोपावे. हात खांद्याच्या शेजारी ठेवावे. संपूर्ण शरीर हाताच्या जोरावर वर उचलावे. पायाची बोटे फरशीवर घट्ट रूतवून ठेवावी. गुडघे सरळ ठेवावेत. गुडघे, कंबर, पाठ हे सर्व सरळ रेषेत असावेत. मनगट खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजे. काही वेळ याच मुद्रेत रहावे मग पुर्वस्थितीत यावे.
- वसिष्ठासन : संतुलनासनापासूनच हे आसन सुरू करावे लागते. उजवा हात जमिनीवर टेकवावा आणि डावा हात फरशीवरून काढून घ्यावा. संपूर्ण शरीर डाव्या बाजूला सरळ ठेवावे आणि डावा पाय फरशीवरून उचलून उजव्या पायावर ठेवावा. डावा हात कंबरेवर असावा किंवा वर सरळ हवेत उचलावा. गुडघा, टाच, पाय सरळ आणि एकमेकांना चिकटलेले असावेत. त्यानंतर मान वळवून डाव्या हाताकडे पहावे. थोडा वेळ याच मुद्रेत रहावे. मग हळुहळु संतुलनासनात यावे. हीच क्रिया डाव्या बाजूलाही करावी.
- पादहस्तासन : सरळ ताठ उभे रहावे. आता श्वास सोडत हळुहळू खाली वाकावे. नाकाने गुडघ्यांना स्पर्श झाला पाहिजे. हात पायाच्या बाजूला तळवे जमिनीला टेकलेले असावेत. हात पायापर्यंत पोहोचत नसल्यास गुडघ्यात थोडे वाकावे. हळुहळु या आसनाचा सराव करत राहिल्यास गुडघे सरळ करावेत. छाती मांडय़ांना लागली पाहिजे. थोडा वेळ याच स्थितीत रहावे. नंतर सामान्य स्थितीत यावे.
- धनुरासन : पोटावर झोपावे. गुडघे वर उचलावेत. हातांनी घोटे पकडावेत. शक्य तितके पाय वर उचलावेत. या मुद्रेत काही काळ रहावे मग पूर्वस्थितीत यावे.
या काही आसनांमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल तसेच शरीराची लवचिकताही कायम राहाण्यास मदत होईल.