चाचणी यशस्वीतेनंतरही बेळगाववासीय वंचित
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे विभागाकडून बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास विलंब होत आहे. वंदे भारतची चाचणी होऊन 20 दिवस उलटले तरी अद्यापही रेल्वे सुरू करण्याबाबत कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही. अधिवेशनकाळात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना नेमके घोडे अडले कोठे? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
बेंगळूरला उत्तर कर्नाटकातील जिल्हे जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगावमधील नागरिकांनी वंदे भारतची मागणी रेल्वेकडे लावून धरल्याने रेल्वेला विचार करावा लागला. 21 नोव्हेंबर रोजी बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससाठी चाचणी घेण्यात आली. यामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अवघ्या साडेसात तासांमध्ये बेळगाव-बेंगळूर मार्गावर आलिशान प्रवास करता येणार असल्याने वंदे भारत केव्हा सुरू होणार? याची उत्सुकता लागली होती.
बेळगावमध्ये वंदे भारतच्या स्वच्छतेसाठी अनेक सोयी नसल्याने मागील काही दिवसांत त्यांची पूर्तता केली जात आहे. वंदे भारत बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यामध्ये पाणी भरण्यासाठी वॉटर फिलिंग व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 मध्ये वॉटर फिलिंगसाठी खांब उभे करण्यात आले असून त्यावर जलवाहिनी बसविली जाणार आहे. याबरोबरच इतर सुविधाही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, वंदे भारत केव्हा सुरू होणार, याबाबतची अधिकृत माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने जाहीर केलेली नाही.
बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यास हुबळी-धारवाडच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याने येथील नागरिकांकडून विरोधाचा सूर उमटत आहे. बेळगावला वंदे भारत सुरू झाल्यास हुबळी-धारवाडचे महत्त्व कमी होईल, अशी चिंता तेथील प्रवाशांना आहे. त्यामुळे हुबळी-धारवाडच्या नागरिकांमधून विरोध केला जात आहे. अशातच अधिवेशन काळात वंदे भारत सुरू झाल्यास याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळेल. यामुळे वंदे भारत सुरू करण्यास विलंब केला जात आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.









