आपल्या समाजात वंचित, गरीब घटकांमधल्या अनेक महिला आहेत. या महिलांना स्वावलंबी बनवण्याची नितांत आवश्यकता आहे. कांचन परुळेकर यांनी हे शिवधनुष्य हाती पेललं असून त्या बँकेतली नोकरी सोडून वंचित घटकांमधल्या
महिलांच्या उद्धारासाठी झटत आहेत. वंचित घटकांसाठी काम करण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणीच बघितलं आणि स्वयंसिद्धाच्या माध्यतातून ते पूर्णही केलं.
कोल्हापूर येथील समाजसेविका कांचन परुळेकर यांनी स्वतःसोबतच वंचित, गरीब घटकांमधल्या गरजू महिलांना स्वावलंबी, स्वयंसिद्ध केलं. बँकेची उत्तम पगाराची नोकरी सोडून त्या सामाजिक क्षेत्राकडे वळल्या. अर्थात या सगळ्याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं. समाजातल्या वंचित घटकांच्या भल्यासाठी काम करण्याचं स्वप्नं कांचनताईंनी लहानपणीच बघितलं होतं. वंचित घटकांमधल्या महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं उद्दिष्ट त्यांनी उराशी बाळगलं होतं. सुरूवातीला त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली. कालांतराने त्या बँकिंग क्षेत्राकडे वळल्या. बँकेत व्यवस्थापकाच्या पदापर्यंत पोहोचल्या. मात्र या काळात बालपणीचं स्वप्नं, आयुष्याचं उद्दिष्ट त्या विसरल्या नव्हत्या. कांचन यांचं बालपण गरिबीत गेलं. मात्र त्यांचे आईवडील सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असत. कांचनताईंची आई शिवणकाम करत असे तर वडील सामाजिक कार्यकर्ते होते. लोकांना शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छ पाण्यासारखे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला. कांचनताईंच्या कुटुंबातल्या सदस्यांकडे शैक्षणिक पदव्या नव्हत्या. मात्र पन्नास आणि साठच्या दशकातही हे कुटुंब विचारांनी खूप पुढे होतं. कांचनताई आईवडीलांचा संघर्ष बघत होत्या. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी आरोग्य या विषयावर भाषण दिलं. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. व्ही. टी. पाटील यांना कांचनताईंचं भाषण खूपच आवडलं. त्यांनी कांचनताईंना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदार स्वीकारली. डॉ. पाटील यांनी ‘स्वयंसिद्धा’ नावाची संस्था स्थापन केली होती. पाटील यांच्या निधनानंतर कांचनताईंनी या संस्थेची जबाबदारी स्वीकारली. गेल्या 28 वर्षांच्या काळात कांचनताईंनी ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून 6500 महिलांना विविध उद्योगांचे धडे देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं आहे.
गरिबी हे सगळ्या समस्यांचं मूळ आहे, हे कांचनताई जाणून होत्या. लहान वयात त्यांनीही गरिबीच्या झळा सोसल्या होत्या. त्यांना इतरांनी वापरलेली पुस्तकं आणि कपडे वापरावे लागले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती आवश्यक आहे हे त्यांना माहीत होतं. कांचनताई आई-वडीलांसोबत सभा, बैठकांना हजेरी लावत होत्या. सोबतच त्या कलाशाखेत द्विपदवीधर झाल्या. शिक्षण क्षेत्रातली पदविका प्राप्त केली. साधारण दहा वर्षं शिक्षिकेची नोकरी केली. मग बँकिंगकडे वळल्या. चौदा वर्षं बँकेत नोकरी केली. व्यवस्थापक झाल्या. बँकेत नोकरी करत असतानाही त्या बँकेतर्फे आयोजित सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या. 1992 मध्ये त्यांनी बँकेची नोकरी सोडली आणि स्वयंसिद्धाच्या कामाला वाहून घेतलं. स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शहरी तसंच ग्रामीण भागातल्या महिलांना विविध कौशल्यं विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. या व्यतिरिक्त स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना कर्जही उपलब्ध करून दिली जातात. त्यांना गुंतवणूकविषय सहाय्य केलं जातं. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ‘स्वयंप्रेरिका’ नावाची सहकारी औद्योगिक सोसायटीही स्थापन करण्यात आली आहे. कांचनताई 70 वर्षांच्या आहेत. मात्र या वयातही त्या धडाडीने काम करत आहेत. महिलांना स्वयंसिद्ध करण्याचं बालपणीचं स्वप्नं त्या जगत आहेत.









