ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. माधव कामत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
इतिहास आपणास आत्मभान देतो, आत्मसन्मान जागृत करतो, आपणास कार्यप्रवण करतो, पराक्रम करण्यास उद्युक्त करतो, आपल्या पराक्रमी स्त्राr पुऊषांच्या पराक्रमांच्या स्मृती जागृत ठेऊन आपला भविष्यकाळ उज्वल करण्याची शक्ती देतो. वेलिंगकर यांनी ‘लोटांगण’मध्ये वस्तुनिष्ट, तटस्थपणे, आणि यथोचित संयमाने गोव्यातील एका अस्वस्थ पर्वाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन प्रा. माधव कामत यांनी केले.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लिहिलेल्या ’लोटांगण’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. श्रीविद्या प्रतिष्ठानतर्फे येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात काल रविवारी आयोजित या कार्यक्रमास व्यासापिठावर त्यांच्यासमवेत खास निमंत्रित ज्येष्ठ पत्रकार गुऊदास सावळ, नितीन फळदेसाई आणि मोठ्या संख्येने चाहते आणि हितचिंतकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. कामत यांनी इतिहास म्हणजे मागच्या पिढीने केलेल्या चुका, गैरकृत्ये आणि गैरविचारांचा रिकॉर्ड असतो. त्याच्या आधारे पुढील पिढीस त्या चुका टाळून प्रकाशाकडे, सत्याकडे आणि विजयाकडे वाटचाल करता येते. गोव्यात गाजलेले भाषा माध्यमाचे आंदोलन हा एका अस्वस्थ पर्वाचा परिपाक होता. लेखकाने अत्यंत वस्तुनिष्ट, तटस्थपणे, आणि यथोचित संयमाने त्या अस्वस्थ पर्वाचे ‘लोटांगण’मध्ये लेखन केलेले आहे, असे सांगितले.
शंभर नंबरी सोन्यासारखे
प्रा. वेलिंगकरांनी लिहिलेल्या भाषा आंदोलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा प्रांत या अभेद्य संघटनेचे झालेले द्विभाजन या दोन्ही घटनांवर आधारित या पुस्तकातील प्रत्येक घटनेचे ते स्वत: साक्षिदार आहेत. त्यामुळे या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व असून ते 100 नंबरी सोन्यासारखे ठरले आहे. म्हणुनच एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून पुढील कित्येक पिढ्यांसाठी ते उपयोगी पडेल असे प्रा. कामत म्हणाले.
लोटांगण म्हणजे विश्वासार्ह इतिहास
इतिहासकार साधारणत: दोन प्रकारचे असतात. त्यातील पहिला ज्यांचा त्या इतिहासाशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संबंध नसतो. ऐतिहासिक घटनांच्या आधारे ते इतिहास लिहितात. दुसऱ्या प्रकारातील इतिहासकार हा त्यातील प्रत्येक घटनेचा एकतर साक्षिदार असतो किंवा शिल्पकार तरी असतो. जे इतिहास घडवतात त्यांना ऐतिहासिक घटनांची अंतर्बाह्य तथा खडानखडा माहिती असते. बित्तंबातमी असते, म्हणून त्यांनी लिहिलेला इतिहास विश्वासार्ह असतो. लोटांगण हा विश्वासार्ह इतिहास आहे, असे प्रा. कामत पुढे म्हणाले.
श्रेष्ठ मार्गदर्शकाचे स्थान वेलिंगकरांना मिळेल
संवेदनशील वाचकासाठी लोटांगणमधील लेखांचे वाचन हे अस्वस्थ करणारे तर आहेच, त्याचबरोबर ते दु:खदायकही आहे. अशावेळी हा ग्रंथ लोकशिक्षणाचे साधन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वप्नपूर्ततेच्या मार्गात असंख्य अडचणी आहेत. रात्र आजही काळखीच आहे, परंतु ती संपेल अशी आशा आहे. लवकरच सुर्योदय होईल, प्रकाशाचे राज्य येईल. हत्तीच्या सुयोग्य वाटचालीसाठी माहुतांची गरज असते. अशा माहुतांची मांदियाळीसुद्धा आपल्याला भेटेल आणि त्या मांदियाळीमध्ये श्रेष्ठ मार्गदर्शकाचे स्थान प्रा. वेलिंगकर यांना मिळेल, अशी सदिच्छा प्रा. कामत यांनी व्यक्त केली.
……………………………………………………………………………………………………..









