येडियुराप्पा यांची घोषणा : निजदला चार जागा सोडून देणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजप-निजदमध्ये युती होणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे. युतीसाठी निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. देवेगौडा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. शहा यांनी भाजप-निजद युतीला सहमती दर्शविली असून चार मतदारसंघ सोडून देण्यास तयार असल्याचे सांगितल्याचे येडियुराप्पा म्हणाले.

बेंगळूरच्या फ्रीडम पार्क येथे काँग्रेस सरकारच्या जनविरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्य भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पांनी भाजप-निजद युतीची माहिती दिली. युतीमुळे भाजपला अधिक जागा मिळण्यास मदत होईल शिवाय पक्षाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात 20 ते 25 जागांवर विजय मिळेल. मी लवकरच राज्य दौरा हाती घेणार असून लोकसभा निवडणुकीत भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभेतील सर्व विरोधी नेते देशपातळीवर एकत्र होत असतानाच राज्यात निजदने भाजपबरोबर युती केली आहे. युतीसाठी माजी पंतप्रधान आणि निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. उभयतांमध्ये राजकीय स्थितीविषयी देखील चर्चा झाली. चर्चेदरम्यान देवेगौडा यांनी शहा यांना आपल्या पक्षाला चार ते पाच जागा सोडून देण्याची अट घातल्याचे समजते त्यावर शहा यांनी संमती दर्शविल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार हासन, तुमकूर, मंड्या, चित्रदुर्ग आणि कोलार हे मतदारसंघ निजदला सोडून देण्याची विनंती भाजपश्रेष्ठींकडे देवेगौडांनी केली आहे. मंड्या वगळता उर्वरित मतदारसंघ सोडून देण्यास संमती दर्शविण्यात आली. परंतु, मंड्या मतदारसंघाविषयी अद्याप निर्णय घेणे शक्य झाले नसल्याचे समजते.
सध्या मंड्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अपक्ष खासदार सुमलता अंबरिश या करत आहेत. त्यांची अप्रत्यक्षपणे भाजपशी जवळीक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांनाच भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
दोन लाचार एकत्र : शेट्टर
निजद-भाजप युतीवर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, दोन लाचारांनी युती केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-निजद एकमेकांना भिडले होते. पराभव झाल्याने ते आता एकत्र आले आहेत. लाभ मिळत असताना युती करावी, अन् प्रतिकूल परिस्थितीत माघार घ्यावी, अशी स्थिती या दोन्ही पक्षांची आहे. त्यामुळे या पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशी टीका शेट्टर यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत कोण युती करणार?, कोण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार?, याविषयी आम्ही डोकेदुखी करून घेणार नाही. जनतेजवळ मतयाचना करणार आहे. जनता आमच्या पाठिशी आहे.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष









