अधिकाऱ्यांना विकासकामे लवकर पूर्ण करण्याचा निर्देश :
वृत्तसंस्था/ पाटणा
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असून याकरता सुमारे वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे, परंतु ही निवडणूक त्यापूर्वीच घेतली जाऊ शकते असा संशय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी व्यक्त केला. पाटण्यात विविध प्रकल्पांचा शुभारंभ केल्यावर नितीश कुमार यांनी यासंबंधी वक्तव्य केले आहे.
लोकसभेची मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता पाहता लवकरात लवकर विकासकामे पूर्ण करा असा निर्देश नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. जानेवारी 2024 पर्यंत विकासकामे पूर्ण होतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु ही विकासकामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात यावीत. लोकसभा निवडणूक कधी होईल हे कुणीच जाणत नाही, निवडणूक पुढील वर्षीच होईल असे नाही. त्यापूर्वीच ही निवडणूक होण्याची शक्यता पाहता विकासकामे जलदगतीने पूर्ण करा असे नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मी मंत्री होतो. वाजपेयींनी अत्यंत उत्तमप्रकारे काम केले हेते. त्यांनी ग्रामीण रस्त्यांच्या निर्मितीस सुरुवात केली होती. त्यावेळी पूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जात होता. परंतु आता पंतप्रधान ग्राम सडक योजनेकरता केंद्र सरकार 60 टक्के निधीच पुरवित आहे. आता भाजपकडूनच अटलबिहारी वाजपेयींचे नाव घेतले जात नसल्याचे म्हणत नितीश कुमार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्नशील
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नितीश कुमार हे सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित होणार आहे. याकरता काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी, सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे मानले जात आहे. परंतु काही पक्षांनी नितीश कुमार यांच्या या बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविलेली नाही. यात मायावती यांचा बसप, तेलंगणातील बीआरएस, ओडिशातील बीजद, आंध्रमधील वायएसआर काँग्रेसचा प्रामुख्याने समावेश आहे.