पुणे \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणासाठी सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणावर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी यांनी लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारवर सडकून टीका केली. लोकप्रतिनिधींना अडवून गाडलं पाहिजे अशी भूमिकाच त्यांनी मांडली. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा, असे देखील ते म्हणाले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांना उदयनराजेंनी लोकप्रतिनिधींना अडवून गाडण्याची भूमिका घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सगळेच लोकप्रतिनिधी ना अशी विचारणा करत बोलणारेही लोकप्रतिनिधी असा टोला उदयनराजे भोसले यांना लगावला.
उदयनराजे भोसले काय म्हणाले होते ?
पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर काल, सोमवारी चर्चा झाली. भेटीनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच ते म्हणाले की, राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाडलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.
Previous Articleज्यांना लक्षणे आहेत अशांची टेस्ट, सरसकट टेस्टिंग नाही- आडिवरेकर
Next Article 24 कॅरेट सोने आता इतिहासजमा








