चिपळुणातील परिस्थिती, लाखो रूपयांची कामे करून बिले मिळणे झालेय कठीण
प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण नगर परिषदेत सुरू असलेल्या राजकारणाचा फटका ठेकेदारांना बसत आहे. लाखो रूपये खर्च करून शहरात केलेल्या विकासकामांची त्यांना बिले मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. तसेच काही निर्णयांचा त्यांना कायम फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे धाव घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर नगर परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षे शांत असलेले राजकारण चांगलेच तापले असून सध्या ते अधिकच तापत आहे. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या नगर परिषदेच्या पैशाचा अपव्यय करीत आहेत असा, तर खेराडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते काहींना आपले बंद पडलेले दुकान पुन्हा मिळवणे व आरोप करून आपले हित साधायचे असल्याचा आरोप करीत आहेत. या राजकारणातून अनेक विकासकामांची मंजुरी नाकारण्यात आली असून अर्थसंकल्पाच्या वाढीव खर्चाच्या नामंजुरीचा ठराव करण्यात आला असल्याने या साऱया प्रकारात विकास थांबला आहे.
शहरातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी अनेक ठेकेदार आहेत. हे ठेकेदार निविदा प्रक्रियेत भाग घेऊन कामे मिळवतात. ही कामे पूर्ण झाल्यावर त्यांना अनेक प्रकारच्या प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर काही कामांसाठी थर्ड पार्टी ऑडीट झाल्यावर बिले देण्यात येतात. मुळातच या साऱया प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. काही ठेकेदार स्वत:च्या पैशांनी, तर काहीजण यासाठी कर्ज काढून घेतलेली कामे पूर्ण करतात. काही वर्षे मागे जाता सर्व नगरसेवक एकत्र असल्याने या ठेकेदारांना बिले मिळवण्यात अडचणी येत नव्हत्या. मात्र आता अर्थसंकल्प ठराव व अन्य कारणांनी त्यांना बिले मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबतचा ठराव रद्द करून ठेकेदारांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा ठरावच रद्द करावा, अशी मागणी सोनाली कन्स्ट्रक्शन व आरती कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र बेर्डे यांच्यासह काही ठेकेदारांनी जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याकडे केली आहे. त्यानुसार एकदा सुनावणी झाली असून दुसरी सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय देतात, याकडे ठेकेदारांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वाढीव खर्च करताना निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या नसल्याने ठेकेदारांना बिले मिळणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
आघाडीचा सर्वांनाच त्रास: खातू
या बाबत बोलताना नगरसेवक व भाजपाचे शहराध्यक्ष आशिष खातू म्हणाले की, शहरात कोरोनाची नव्हे तर महाविकास आघाडीची महामारी आली आहे. त्यांच्यामुळे ठेकेदारांसह नागरिकांचेही मोठे नुकसान होत असून विकासाला खीळ बसली आहे.









