1 अब्ज 10 कोटी 62 लाख 74 हजारांची देव-घेव
प्रतिनिधी / बेळगाव
लोकअदालतमधून खटले निकालात काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे नियमित न्यायालयांमधील खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे हे खटले लोकअदालतच्या माध्यमातून निकालात काढण्यासाठी बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकारने मोठे प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीमध्ये 11 हजार 204 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये एकूण 1 अब्ज 10 कोटी 62 लाख 74 हजार 884 रुपयांची देव-घेव झाली आहे.
एकूण 32 हजार 354 प्रलंबित खटले घेण्यात आले होते. वादी आणि प्रतिवादी यांना समोरासमोर बसवून हे खटले निकालात काढण्यात आले आहेत. मुख्य जिल्हासत्र न्यायालयासह इतर न्यायालयातील खटले या लोकअदालतीमध्ये घेण्यात आले होते. चेकबॉन्स, थकीत कर्ज, बीएसएनएल थकीत बिल, विजेचे थकीत बिल, विमा, नुकसानभरपाई याबाबतचे खटले अधिक निकालात काढण्यात आले आहेत.
राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली होती. त्यामध्ये प्रलंबित खटले निकालात काढून पक्षकारांना दिलासा देण्यात आला. कोरोनामुळे अनेकांनी बँक, सोसायटी, फायनान्स यासह इतर कर्जे भरलीच नव्हती. त्यामुळे सोसायटीसह इतरांनी सहकार्य केले. त्यातूनच हे खटले निकालात काढण्यात आले आहेत. या लोकअदालतीसाठी मोठी गर्दी उसळली होती. सर्व न्यायाधीशांनी हे खटले अधिकाधिक निकालात काढून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
आजपर्यंत इतक्मया मोठय़ा प्रमाणात खटले निकालात लागले नव्हते. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, बेळगाव बार असोसिएशन व जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने ही लोकअदालत भरविण्यात आली होती. ही लोकअदालत मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ऑनलाईनच्या माध्यमातूनही बरेच खटले निकालात काढण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्समधून पक्षकाराचे म्हणणे ऐकून घेऊन हे सर्व खटले निकालात काढले गेले आहेत. संपूर्ण राज्यात बेळगाव न्यायालयाने एक वेगळा विक्रम केला आहे. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव व न्यायाधीश विजय अरस यांनी ही लोकअदालत भरविण्यासाठी प्रयत्न केले होते. या लोकअदालतीमध्ये जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्यासह इतर अधिकाऱयांनीही सहभाग घेतला होता.









