पोलिसबळाविना सर्वत्र लॉकडाऊन यशस्वी : राज्यातील सर्व मार्केट परिसरात शुकशुकाट :सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद
प्रतिनिधी / पणजी
काल शुक्रवारपासून सुरु झालेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊनला जनतेने स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने काल पहिल्या दिवशी रस्ते सुनसान झाले. मार्केट परिसर ओस पडल्याचे दिसून आले. लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन असले तरी तरी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले नाही. कोरोनाच्या वाढत्या फैलावाची दखल घेऊन लोकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र खनिज वाहतूक सुरू राहिल्याने लॉकडाऊनला गालबोट लागले. राज्यातील औद्योगिक वसाहती सुरू होत्या. लोकांना लॉकडाऊनच्या बरोबरच दिवसभर पडणाऱया मुसळधार पावसालाही समोरे जावे लागले.
कोरोनाने भयानक रूप धारण केल्याने त्यावर लॉकडाऊन हाच पर्याय हे लोकांना आता पटू लागले आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाणही वाढू लागल्याने आता लोकांमध्ये कोरोनाबाबत धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्री, आमदार व विरोधकही लॉकडाऊनसाठी सरकारवर दबाव वाढवित आहेत.
पोलिसबळाविना लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
शुक्रवार ते रविवार असे तीन दिवसांचे लॉकडाऊन सरकारने घोषीत केले आहे. काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी लोकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे पोलीस बळाचा कुठेही वापर करावा लागला नाही. ज्या भागात कोरोनाची जास्त बाधा झाली आहे अशा भागात लोकांनी कडकडीत लॉकडाऊन पाळले. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. रस्त्यावरील वाहतूक खूप कमी झाली होती. मात्र आमोणा, सांखळी ते शिरसईपर्यंत खनिज वाहतूक सुरू झाली होती. लोकांनी खनिज वाहतूक अडवून बंद करण्यास भाग पाडले.
जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. त्यामुळे दुध, पाव, वर्तमानपत्रे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंची काही दुकाने व औषधालये सुरू होती. राज्यातील उद्योग सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती, त्यामुळे काही उद्योग सुरू राहिले.
राज्यातील सर्व मार्केट परिसरात शुकशुकाट
कोरोनाची धास्ती घेतल्यामुळे मार्केटमधील दुकानदार व अन्य व्यावसायिकांनी लॉकडाऊनला पूर्ण सहकार्य केले. दुकाने, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स व अन्य सर्व प्रकारचे व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश असल्याने मार्केट परिसरात पूर्णपणे शांतता दिसून आली. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. रस्ते मोकळे वाटत होते. संपूर्ण गोव्यात विविध भागात शुकशुकाटाची स्थिती निर्माण झाली होती.
सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद
खाजगी बसगाडय़ा, कदंब बसगाडय़ा, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. तसेच टॅक्सी व्यावसायिक मोटरसायकल पायलट, रिक्षा आणि छोटी मालवाहतूक करणारी वाहनेही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.
पणजी शहर पूर्ण लॉकडाऊन
राजधानी पणजी शहर पूर्णपणे लॉकडाऊन झाले. मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मनपा मार्केट, मासळी मार्केट, कांपाल परिसर ते मिरामारपर्यंत सर्वत्र शांतता आणि काही भागात शुकशुकाट दिसून आला. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. लोकांनी स्वतः घराबाहेर पडणे टाळले. कोरोनाची धास्ती वाढत चालल्याने पणजीतील लोकांनी स्वतः घरी रहाणे पसंत केले.
लॉकडाऊन किमान 15 दिवसांचे हवे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यात सर्वत्र लॉकडाऊन कडक पाळण्यात आले. केवळ 3 दिवस नाही तर निदान 15 दिवस लॉकडाऊन पाळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. जनतेने मुख्यमंत्र्यांच्या या लॉकडाऊन आदेशाचे स्वागत केले आहे मात्र हे लॉकडाऊन महिन्या दिवसापूर्वी झाले असते तर आज राज्यात कोरोनाचे चित्र वेगळे असते अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.









