प्रतिनिधी / ओटवणे:
कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका माडखोल सातुळी सीमेदरम्याच्या नदीवरील काम सुरू असलेल्या पुलालाही बसला असून पुलाचे काम रखडले आहे. गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या या पुलाचे काम 60 टक्के पूर्ण झाले होते. यावर्षी उर्वरित काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे येथील जनतेची यावर्षी पुलाबाबतचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.
शासनाच्या नाबार्ड योजनेंतर्गत या पुलासाठी सुमारे पावणेतीन कोटीचा निधी मंजूर आहे. सातुळी व माडखोल सीमेवरील नदीवर बांधण्यात येत असेला हा पूल बांदा-दाणोली या मार्गाला सातुळी येथे तर सावंतवाडी-बेळगाव या आंतरराज्य मार्गाला माडखोल येथे जोडण्यात येणार आहे. वाहतुकीच्यादृष्टीने हा महत्त्वाचा पूल असून वाहतुकीस खुला झाल्यानंतर सातुळी, बावळाट, केसरी व फणसवडे ही दुर्गम गावे दाणोलीला न जाता थेट सावंतवाडीला जोडणार आहेत. सुमारे 70 मीटर लांबीच्या या पुलाचे काम मार्च महिन्यात युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. अडीच महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. मात्र, तोपर्यंत परप्रांतीय कामगार आपल्या गावी गेल्याने पुलाचे काम रखडले आहे. पुलाच्या संरक्षक कठडय़ासह जोडरस्त्याचे काम शिल्लक आहे. पावसाळा तोंडावर आल्याने व कामगार नसल्याने उर्वरित काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
अनेक वर्षांपासून या नदीवर पूल बांधण्याची या परिसरातील जनतेची मागणी होती. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने पुलासाठी भरघोस निधी मंजूर झाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे पुलाचे स्वप्न यावर्षी साकार होणार होते. मात्र, लॉकडाऊनचा फटका बसल्याने येत्या पावसाळय़ानंतर हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे.









