वार्ताहर/ औंध :
कष्टाने पिकवलेल्या भोपळ्याचे पिक आता हातात आले आहे.उत्पादनही चांगले निघाले. मात्र आता ते लॉकडाऊन मध्ये अडकले असल्याने सुमारे 20 टन भोपळ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे दारापुढे पडलेल्या भोपळ्याचे आता करायचे काय या चिंतेने औंध येथील शेतकरी उमेश जगदाळे यांना ग्रासले आहे.
औंध येथील उमेश गोविंद जगदाळे या शेतकयांने काहीतरी वेगळे पीक घेऊया यासाठी आले या मुख्य पिकात भोपळा हे आंतरपीक घेतले,प्रथमच भोपळ्याचे पीक लावल्याने अगदी तन-मन-धनाने त्या पिकाची देखभाल केली,आंतरपिकातून विक्रमी उत्पादन घ्यायचे या उद्देशाने सर्व खते,औषधे यासाठी न डगमगता खर्च केला.आता पिकांची वाढ बघून समाधान मिळत होते,तर मोठी आर्थिक उलाढालही होणार होती या नियोजनात असणाया या शेतकयाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
भोपळा पिकासाठी मुंबई ही मोठी बाजारपेठ आहे,अगदी सर्वसाधारण दहा रुपये किलो दराने जरी गेला तरी दोन लाख रुपये मिळाले असते,मात्र आता लॉकडाऊन असल्याने व्यापारी माल खरेदीसाठी येत नाहीत आणि शेतकरी मुंबईला माल पाठवू शकत नाही अशी अवस्था झाली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी वर्गाला फटका बसत आहे.
भोपळा काढून दहा दिवस झाले पडला आहे.3 मे ला लॉकडाऊन उठेल असे वाटले होते,व्यापारी लोकांशी चर्चा झाली होती मात्र लॉकडाऊनमुळे त्यास बाजारपेठेत उठाव नाही असे त्यांचे म्हणणे येत आहे,आता लॉकडाऊन उठेपर्यंत वजन घटणार व भोपळा खराब होऊन टाकून देण्याशिवाय पर्याय नाही.
उमेश जगदाळे- शेतकरी औंध









