“आमच्या वॉर्डमध्ये नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी परवा गरिबांना एकेक किलो तांदूळ आणि गहू, शिवाय डाळ, साखर वगैरे वाटले.’’
“आमच्याकडे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना पोलिसांनी पकडलं आणि उठाबशा काढायला लावल्या. दोघांनी नगरसेवकाला फोन केला. पण त्यानं फोन घेतला नाही.’’
“दारूची दुकाने उघडली तेव्हा मी प्रामाणिकपणे दुकानासमोर रांगेत आखलेल्या चौकोनात उभा होतो. एक हरामखोर माणूस रांगेमध्ये घुसला. तो चौकोनात उभा नसूनही दुकानदाराने त्याला जुन्या ओळखीपोटी माल दिला. त्यात पंधरा मिनिटे गेली. माझा नंबर आला तेव्हा पोलिसांनी दुकान बंद करायला लावले. एकूण काय, खऱयाची दुनिया राहिली नाही.’’
“लॉकडाऊनमध्ये आम्ही चांगलेचुंगले पदार्थ करून खातो अशी शेखी मिरवणारे आणि त्या पदार्थांचे फोटो टाकणारे निम्मे लोक लबाड असतात. फोडणीत मोहरी आणि कांदा न वापरता पिठलं केलं तरी त्याचा फोटो आम्रखंडाचा म्हणून टाकता येतो. फार फार पूर्वी चिं. वि. जोशी यांच्या एका कथेत या आयडियेचा उल्लेख आहे.’’
“घरातली सगळी पुस्तकं वाचून संपली. पुस्तके दारूसारखी जीवनावश्यक नसल्याने त्यांची दुकाने आणि वाचनालये बंद आहेत. टीव्हीवर गेल्या महिन्यात राजभवनमध्ये नेते गेल्याच्या बातम्यांनी पिच्छा पुरवला होता. आता विधानपरिषदेची उमेदवारी, नि÷ावंतांची नाराजी, रुसवे, फुगवे या बातम्यांनी नुसता वात आणला आहे. शिवाय बातम्यांच्या मध्ये बटाटे वडे खाऊन फिट राहतो असे सांगणारा नट आणि गाणे म्हणत सामोसे तळणारी बाई आणि साबण लावून तरुण दिसते असे म्हणणारी नटी यांचा छळवाद निराळाच.’’
“कंप्युटरमधलं आणि इंटरनेटमधलं खूप समजतं अशी शेखी मारणाऱया बंडूने ऑनलाईन पेमेंट करून बीअर मागवली. पण पैसे गेले आणि बिअर आलीच नाही. त्याने हे दु:ख फेसबुकवर मांडलं. मी त्याच्या बायकोला फोन करून मानभावीपणे म्हणालो की वहिनी एका अर्थाने हे चांगलंच झालं. बंडूला देवानेच दारूपासून दूर ठेवलं. तर बंडूची बायको माझ्यावरच भडकली. तेव्हा समजलं की तिला देखील बिअर आवडते. काय बोलणार?’’
“यंदा सगळीकडे कोरोनाने धुमाकूळ घातलाय म्हणून विचारतो, आषाढीच्या वारीला जाणार का? ’’
“जायला पाहिजे. इतक्मया वर्षांची परंपरा आहे. विठुराया आमचं कोरोनापासून नक्की रक्षण करील.’’ “मला मात्र वेगळी खात्री आहे आयत्या वेळी वारीला जाणं टाळण्याची आणि कोरोनापासून सुखरूप राहण्याची विठुराया तुम्हाला बुद्धी देईल.’’








