ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच कारखाने, व्यवसाय, व्यापार, शेती उद्योग आणि रोजगार बंद आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर बेरोजगारी वाढून विकासदर दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापासूनच काटकसर करून उद्याच्या संकटाचा सामना केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
शरद पवार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, देशावर कोरोनाचे भयंकर संकट आहे. त्यातच आर्थिक संकट अधिक गंभीर आहे आणि त्याचे दुष्परिणाम अनेक दृष्टीने होतील. विशेषतः रोजंदारीवर परिणाम होईल. बेरोजगारी वाढेल. जाणकारांनी सांगितले आहे की विकासदर अगदी दोन टक्केपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हीच स्थिती राहिली तर त्याचे दुष्परिणाम हे सहन करावे लागतील.
आज जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल आणि म्हणूनच आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचा विचार केला पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. हे संकट संपणार आहे. आपण आजच्या स्थितीला तोंड देऊ, उद्याच्या स्थितीलाही तोंड देऊ आणि उद्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज उत्तम रीतीने तयारी करू आणि या संकटावर आपण मात करू. पुढचे काही दिवस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय काटकसरीने राहण्याच्या संबंधित विचार करावा लागेल. वायफळ खर्च देखील टाळावे लागतील. काटकसरीचे धोरण आपल्याला निश्चितपणे अवलंबवावे लागेल, योग्य ती काळजी आपण सर्वांनी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल, असेही पवार यांनी म्हटले आहे.