वार्ताहर/निपाणी :
कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनची घोषणा केली असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. असे असताना लॉकडाऊनचे उल्लंघन करत शुक्रवारी निपाणीत काही घरात फळ व भाजीपाला विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. सामाजिक अंतर ठेवण्याचे भान विसरुन सुरु असलेल्या या प्रकारावर आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी धडक कारवाई करताना संबंधित घरांना टाळे लावण्याची कारवाई केली.
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. अत्यावश्यक सेवेत फळ-भाजीपाला विक्रीला मुभा दिली आहे. याकरीता प्रभागनिहाय परवानेदेखील दिले असून घरोघरी जाऊन विक्रीच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना काही विक्रेते आपल्या राहत्या घरीच फळ-भाजीपाला विक्री करत होते. ग्राहकही खरेदीसाठी याठिकाणी गर्दी करताना सामाजिक अंतराला मुठमाती दिल्याचाच प्रकार घडत होता. हे थांबविण्यासाठी आयुक्तांनी ही कारवाई केली.
गुरुवारी आठवडी बाजार भरेल या अपेक्षेतून ग्राहक निपाणीत खरेदीसाठी येतील. हे लक्षात घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाने पहाटेपासूनच ग्रामीण भागातून येणाऱया रस्त्यावर नाकाबंदी केली होती. प्रत्येक ग्राहकाला शहरात येण्यापूर्वीच परतवले जात होते. असे असताना काही विक्रेते छुप्या पद्धतीने विक्री व्यवसाय करत होते. अशा सर्वच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.









