प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाने जगभर थैमान घातले असून या जीवघेण्या विषाणूपासून वाचायचा उपाय म्हणजे घरीच राहणे हा आहे. जगातील बहुतांश देशांच्या सरकारांनी जनतेला वाचविण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्याला सहकार्य करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. यात खास करून मधुमेही रुग्णांनी खास काळजी घ्यायला हवी, अशा आशयाचे पत्रक केएलईचे वरिष्ठ डॉ. जाली यांनी काढले आहे.
मधुमेही रुग्णांनी या विषाणूपासून वाचण्यासाठी खास दक्षता घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात मधुमेही रुग्णांना इतर आजारी रुग्णांच्या तुलनेत नेहमीच आपली काळजी घ्यावी लागते. म्हणूनच मधुमेही रुग्णांनी सध्याच्या काळात आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीची नियमित काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत स्वत:वर मानसिक अथवा शारीरिक दबाव, तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या शरीराची हृदयाची व फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी लागणारे आवश्यक पोषक अन्न घ्यावे. हलके व्यायाम, प्राणायाम करावेत तरच हे रुग्ण कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यास सिद्धा होऊ शकतील.
सध्याच्या काळात दवाखान्यात न जाता शक्यतो फोनवरून डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी आपल्या शरीराच्या वैद्यकीय अहवालाबाबत चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानुसार आपला आहारविहार, औषधे घ्यावीत, सोशल डिस्टन्स ठेवावे, बाहेरून आल्यावर आपले हात स्वच्छ धुवावेत, आपल्या राहत्या सर्व जागांचे न विसरता निर्जंतुकीकरण करावे, जीवनसत्वयुक्त सकस आहार घ्यावा. सोशल मिडियावर विश्वास न ठेवता स्वत:ची खात्री पडल्यावरच पावले उचलावित, सकारात्मक विचार ठेवा, कुटुंबीयांशी संवाद साधा, इच्छाशक्ती आधिक वृद्धिंगत करा, अती आहार टाळा, रक्त नियमित तपासा अन् त्यात काही फेरफार आढळले तरच त्यांना फोन करून मार्गदर्शन घ्या व त्याप्रमाणे वागा.
लॉकडाऊनला शिक्षा मानू नका
लॉकडाऊनला सरकारने दिलेली शिक्षा मानू नका. आपले विस्मृतीत गेलेले जुने छंद जोपासा, कौटुंबिक वातावरण सकारात्मक ठेवा. घरच्या कामात एकमेकांना मदत करा, शास्त्रीय संगीत ऐका, अध्यात्मिक, वैचारिक पुस्तके वाचा, आपल्या कुटुंबीय, नातेवाईकांसोबत सोशल डिस्टन्सिंग ठेऊन बुद्धिबळ, कॅरम आदी खेळ खेळा, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा, सकारात्मक वातावरण ठेवा, नवीन काही शिका, नवीन गोष्टींची निर्मिती करा, यामुळे कोरोनाशी सामना करणे सोपे होईल. तसेच घरात रहा, सुरक्षित राहा, असे आवाहन डॉ. जाली यांनी केले आहे.









