सातार्डा, सातोसे ग्रामपंचायतीने वीज अधिकाऱयांचे लक्ष वेधले
वार्ताहर / सातार्डा:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करा तसेच सातार्डा गावासाठी कायमस्वरुपी वायरमनची नियुक्ती करा, अशी मागणी सातार्डा व सातोसे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयातील कार्यकारी वीज अभियंता लोकरे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाले आहे. तसेच अनेकांना नोकऱयाही गमवाव्या लागल्या आहेत. गावात उद्योग व्यवसायाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या सातार्डा दशक्रोशीतील वीज ग्राहकांना दिलासा मिळावा, या दृष्टीकोनातून शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे. तसेच सातार्डा गावासाठी कायमस्वरुपी वायरमनची नियुक्ती करावी. जेणेकरुन लोकांची वीज समस्येबाबत होणारी गैरसोय दूर होईल. दशक्रोशीतील लोकांच्या भावनांचा गांभिर्याने विचार करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता लोकरे यांनी याबाबत गांभिर्याने विचार करून दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी सातोसे सरपेच बबन सातोसकर, सातार्डा माजी सरपंच बाळू प्रभू, सागर राऊळ, युवा कार्यकर्ते सागर प्रभू, किरण प्रभू यावेळी उपस्थित होते.









