ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.
3 मे नंतरच्या नियोजनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लॉक डाऊन चा परिणाम सकारात्मक दिसत आहे. मात्र, जे जिल्हे हॉटस्पॉट आहेत तिथे 3 मे नंतरही लॉक डाऊन कायम राहील. तसेच लॉक डाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे. त्यामुळे ‘दो गज दूरी’ हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. असंही त्यांनी यावेळी सांगितले.
येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल प्रुफ करा. ज्या राज्यांत करोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.
सध्या देशात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहर हॉटस्पॉट आहेत. यामुळे या शहरात लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. महाराष्ट्राबरोबर अजूून चार राज्यांनी लॉक डाऊन वाढवण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बोलताना ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लॉक डाऊन अजून एक महिना वाढवण्याची मागणी केली. ते म्हणाले, आपण अजून लॉक डाऊन वाढवले नाही तर आपण या गोष्टींचा सामना करू शकणार नाही.
पंतप्रधानांशी चर्चा झाल्यावर दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये 16 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात येतील असे संकेत दिले आहेत.









