खानापूर / प्रतिनिधी
एफआरपीनुसार जाहीर झालेल्या दरातून तोडणी व वाहतूक खर्च वजा करून शेतकऱयांना अधिकाधिक दर देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची ग्वाही महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी लैला साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभप्रसंगी दिली.
यावेळी विठ्ठल हलगेकर म्हणाले, स्थानिक शेतकऱयांचे हीत डोळय़ांसमोर ठेऊन कारखान्याने वेळेत बिले अदा करून पारदर्शक व्यवहार जपला आहे. व्यवहारापलीकडे शेतकऱयांशी बांधिलकी असल्याने उसाची वेळेत उचल, चोख वजन व समाधानकारक दर या त्रिसूत्रीवर लैला साखर कारखान्याचा भर असल्याचे सांगितले.
यावेळी अवरोळी मठाचे चन्नबसव स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्याखाली भावकेश्वरी व चौराशी देवीचे पूजन झाले. विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते बैलगाडी व वजन काटा पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी भाजप रयत मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश तिरवीर, मल्लनगौडा पाटील, सुबराव पाटील, सदानंद होसूरकर, बसवराज सानिकोप, सुनील मड्डीमणी, बसवराज हिट्टीन, मल्लाप्पा पाटील, चांगाप्पा निलजकर, विठ्ठल करंबळकर, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.
सवलतीच्या दरात साखर वितरण
2019-20 हंगामासाठी लैला साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱयांना टनाला अर्धा किलो याप्रमाणे 25 रुपये प्रती किलो या सवलतीच्या दराने साखर वितरण केले जाणार आहे. गुरुवारपासून कारखाना कार्यस्थळावर वितरणाची सोय करण्यात आली आहे. शेतकऱयांनी आधारकार्ड व ऊस पुरवठा केलेली स्लिप घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी केले आहे.









