एफआरपीप्रमाणे 3437 रुपये दर निश्चित : पत्रकार परिषदेत अध्यक्षांची माहिती
प्रतिनिधी /खानापूर
येथील महालक्ष्मी ग्रूप संचलित लैला साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता 2600 रु. शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. यावषी एफआरपीप्रमाणे 3437 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. वाहतूक व ऊसतोडणी यांचे दर निश्चित करण्यात आल्यानंतर उर्वरित बिल गळीत हंगाम संपल्यावर येणाऱया सणावेळी देण्यात येईल. तसेच दर पंधरा दिवसांनी उसाचा हप्ता शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी कारखान्याच्या विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून आम्ही हा कारखाना चालवत आहोत. पहिली दोन वर्षे कमी उसाचे गळीत झाले. मागीलवषी तीन लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. यावषी पाच लाख टन उस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत 56 हजार टन ऊस गाळप
कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक सदानंद पाटील यांनी सांगितले की, गेल्या 24 ऑक्टोबरला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू केला असून आतापर्यंत 56 हजार टन उसाचे गाळप करण्यात आलेले आहे. इतर कारखान्यांनी अद्याप उसाची वाहतूक सुरू केली नसल्याने लैला साखर कारखान्यावर शेतकरी ऊस मोठय़ा प्रमाणात पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. दररोज 4000 टनाचे गाळप होत असून शेतकऱयांनी सहकार्याची भूमिका ठेवल्यास यावषी जास्तीत जास्त उसाचे गाळप होईल. सर्व शेतकऱयांचा ऊस उचलण्यात आम्ही यशस्वी होऊ. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी 400 टोळय़ा कार्यरत केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱयांनी कोणतीही घाई न करता सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी केले. तसेच मागील वषी ऊस पाठवलेल्या शेतकऱयांना प्रतिटन अर्धा किलो साखर 25 रुपये किलो दराने देण्यात येणार आहे. याचे वितरण सोमवार दि. 14 पासून करणार आहे, असे सांगितले.
यावेळी बी. एम. शेलार, संचालक चांगापा निलजकर, सुबराव बाळागौडा पाटील, परशराम पाटील, भरमाणी पाटील यासह इतर उपस्थित होते.









