प्रतिनिधी / सातारा :
कोरोनामुळे पुढे ढकलेली नीटची परीक्षा रविवारी पार पडली. सातारा जिल्ह्यातील 13 केंद्रावर दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षार्थींना वेळेत गाड्या न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर त्यांना पोहचण्यास उशीर झाल्याने परीक्षेपासून त्यांना मुकावे लागले. साताऱ्यातील केबीपी इंजिनिअरींग कॉलेजच्याबाहेर सुरक्षा रक्षकास विनंती करुनही आतमध्ये सोडण्यात आले नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.
डॉक्टर बनवण्यासाठी नीट परीक्षा महत्वाची असते. त्याकरता विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे अर्ज भरले होते. कोरोनामुळे ही परीक्षा कधी होईल हे सांगता येत नव्हते. 2 मे पासून परीक्षेची तारीख निश्चित होत नव्हती. अखेर 12 सप्टेंबर तारीख निश्चित झाली. सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, डीजी कॉलेज, यशंवतराव चव्हाण कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पोतदार इंटरनॅशनल स्कूल अशा 13 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. परीक्षेकरता सकाळपासूनच परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे आणि त्यात रविवारची सुट्टी असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय संथगतीने असल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास वेळ लागला. परीक्षा केंद्रामध्ये पुकारुनच परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात घेतले जात होते. मात्र, पाच मिनिटे उशीर झाला तरीही विद्यार्थ्यांनी विनंती करुनही आत सोडले नसल्याने अनेकांना परीक्षेपासून मुकावे लागले. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांचा अशा परीक्षांवर कंट्रोल असतो परंतु यावेळी खाजगी शाळेकडे दिला गेला होता. त्यामुळे प्रशासनाचा अभाव दिसून आला.