क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
विश्व हौशी बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारी मंडळाने गोव्याचे लॅनी गामा यांची आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. बॉक्सिंग खेळातील प्रशासकीय तसेच खेळाच्या तांत्रिक बाबीत प्रचंड अनुभव असलेले लॅनी आता विश्व हौशी बॉक्सिंग संघटनेचे मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी, मुल्यांकनकर्ता, निरीक्षक आणि इन्स्ट्रक्टर असतील.
लॅनी गामा हे गोवा बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक सदस्य असून 1994 मध्ये ते राष्ट्रीय बॉक्सिंगचे रेफ्री बनले होते. 2006 मध्ये विश्व हौशी बॉक्सिंग संघटनेचे ते थ्री-स्टार रेफ्री बनले तर 2012 मध्ये ते मुल्यांकनकर्ता बनले. आतापर्यंत लॅनी गामा यांनी कित्येक आशियाई आणि 8 विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रेफ्री म्हणून काम केले आहे. हल्लीच झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत लॅनी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सध्या विश्व हौशी बॉक्सिंग संघटनेने त्यांची 8 ते 18 मे या कालावधीत अर्जेंटिनात होणाऱया अमेरिका ऑलिम्पिक पात्रता फेरीत स्पर्धेसाठी ते निरीक्षक म्हणून जाणार आहेत.









