ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमधील लुधियाना सत्र व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वत्र धावपळ उडाली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीची भिंत कोसळली असून काचेच्या खिडक्याही फुटल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याच्या शक्यतेने एनएसजी आणि एनआयएकडून तपास हाती घेण्यात आला आहे. मात्र, तातडीने या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्विकारली नसली तरी पाकिस्तानचं समर्थन असणारी बब्बर खालसा या स्फोटामागे असल्याचा संशय आहे.
दरम्यान गुरुवारी लुधियाना जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाच दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या स्फोटामागील पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. पाकिस्तानचं समर्थन असणारी बब्बर खालसा या स्फोटामागे असल्याचा संशय आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
स्फोटाच्या हादऱ्याने इमारतीच्या भिंतीचे नुकसान झाले असून, काही वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी धाव घेत नमुने गोळा केले, असे लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले. तपास सुरू असल्याने स्फोटाबाबत तात्काळ आणखी काही सांगणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.









