पोलीस बंदोबस्तात कॉलेज सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
हिजाब विरूद्ध भगवा वादातून बंद ठेवण्यात आलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू झाली. त्यामुळे बेळगावात खबरदारी घेत सर्व महाविद्यालयांच्या फाटकांसमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. धर्माशी संबंधित कसल्याही प्रकारची वस्त्रे परिधान करून कॉलेजमध्ये येऊ नये असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. तरीही आज कॉलेज पुन्हा सुरू झाल्यावर काही विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये ही घटना घडली. यावेळी काही विद्यार्थिनींनी कॉलेजच्या कर्मचाऱयांशी वादही घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लिंगराज कॉलेजसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. यावेळी त्या विद्यार्थिनींनी हिजाब आमचा अधिकार आहे, तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. आम्ही कोणत्याही कारणास्तव हिजाब घालणे बंद करणार नाही असे सांगितले.
याची माहिती मिळताच कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पालक आणि विद्यार्थिनींची समजूत घातली. तसेच उच्च न्यायालयाचा आदेश पाळण्याचे आवाहन केले.