उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘लावणीसम्राज्ञी’ या उपाधीने गौरवलेल्या आणि गेल्या 75 वर्षांत कलाक्षेत्रात योगदान देणाऱया कोल्हापूरच्या सुलोचना चव्हाण यांना सोमवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने तर गायक सोनू निगम यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी एकंदर 65 पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 2022 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केले. यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्यापासून टोकिओ ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱया नीरज चोप्रापर्यंत अनेकांचा समावेश आहे. प्रभा अत्रे आणि कल्याण सिंह यांना पद्मविभूषण, तर भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी भाजप नेते कल्याणसिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र राजवीर सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.
डॉ. बालाजी तांबे यांना आयुर्वेदिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी 50 पुस्तके लिहिली आहेत. तसेच हजाराहून अधिक टीव्ही कार्यक्रमांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्रा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांनी टोकिया ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 87.58 मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. तसेच टोकियो पॅरालिम्पिक गोल्ड मॅडलिस्ट शटलर प्रमोद भगत यांनीही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला.
धारवाडमधील अब्दुल खादर नाडकट्टीन यांना पद्मश्री
कर्नाटकातील धारवाडमधील तळागाळातील कृषी संशोधक अब्दुल खादर नाडकट्टीन यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण भारतातील लघु आणि सीमांत शेतकऱयांना मदत करणाऱया 40 हून अधिक नवकल्पनांचे श्रेय त्यांना देण्यात आले आहे. याशिवाय बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अंतिलला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयरर्लंडचे प्राध्यापक रुट्गर कोर्टेनहोर्स्ट यांना आयरिश शाळांमध्ये संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या प्रयत्नांसाठी पद्मश्री देण्यात आला.
पद्म पुरस्कारांची घोषणा दरवषी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. यंदा एकूण 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या विजेत्यांमध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार्थींमध्ये 34 महिलांसह 10 परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. 13 व्यक्तींना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे.









