मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल-पिवळा ध्वज काही कन्नडधार्जिण्या लोकांनी उभा केला आहे. तो ध्वज हटवावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. त्या विरोधात मोर्चा काढण्याचेही ठरविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. त्याला मान देऊन मोर्चा रद्द करण्यात आला होता. मात्र, अजूनही तो ध्वज हटविला नाही. त्यामुळे 8 मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. लाल-पिवळा हटविण्याबाबत प्रशासनाला मोठा वेळ देण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आता मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, दत्ता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









