प्रतिनिधी / निलंगा
एस टी महामंडळात पगार होत नसल्याने एका कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्यातील शेळगाव येथे एका अनुदानित वसतिगृह अधीक्षकांनी तुटपुंजे मानधन ते सुध्दा वेळेवर होत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासनाने वसतिगृह कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेने दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील हेलंब या गावी समाज कल्याण विभागाअंतर्गत नागाबुवा मागासवर्गीय वसतिगृह असून तेथील चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील 35 वर्षीय भरत किसन राजुरे हा गेल्या 20 वर्षांपासून वसतिगृह अधीक्षक पदावर नोकरी करत होता. सदरील वसतिगृह 100 % अनुदानित आहे. पण कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर नियुक्त्या दिल्या आहेत. सध्याला त्यांना 9 हजार 200 रुपये मासिक मानधनावर काम करत होते.
पण अनेकदा सदरील मानधन कधी 3 महिने तर कधी 6 महिने उशिराने होत असे आणि 20 वर्षांपासूनची वेतनश्रेणीची मागणी प्रलंबीत होती. यामुळे यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत मागच्या काळात कोरोना अन् लॉकडाऊनच्या काळात आर्थिक समस्या वाढत गेल्या. पत्नी दोन मुले आणि आईवडील यांचा सांभाळ कसा करावा दैनंदिन घरखर्च कसा भागवावा या चिंतेत असल्याने भरत किसन राजुरे या वसतिगृह अधिक्षकाने मूळगाव शेळगाव इथं घराच्या मागील बाजूस 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शासनाने वेळेवर मानधन दिल असतं तर जीवन संपवण्याची वेळ मुलावर आली नसती अस वडील किसन राजुरे याच म्हणणं आहे. वसतिगृह अधिक्षकांची मानधन वेळेवर मिळत नसल्यास सतत मानसिक तणावात असलेल्या भरतला गावात ग्रामपंचायतला काम कर असा सल्ला गावातील अशोक पाटील यांनी दिला होता.