जयपूर
भ्रष्टाचारविरोधी दिनी राजस्थानमधील एसीबीच्या पथकाने सवाई माधोपूरमध्ये मोठी कारवाई करत अतिरिक्त पोलीस अधीक्षक भेरूलाल यांना 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. भेरूलाल यांच्याकडून दर महिन्याला हप्त्याच्या स्वरुपात 80 हजार रुपयांची लाच मागण्यात येत असल्याने त्रस्त झालेल्या एका व्यावसायिकाने भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक भेरूलाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. या छाप्याच्या एक तासापूर्वीच भेरूलाल यांनी जाहीर व्यासपीठावरून भ्रष्टाचारविरोधात भाषण ठोकले होते. तसेच लाचखोरी रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन लोकांना केले होते.









