प्रतिनिधी/ लांजा
शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्येस भाग पाडल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे, दिर व जावू अशा नऊ जणांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मयत विवाहितेच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर विवाहितेचा पती हरीश पटेल याच्यासह कुटुंबातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलीस वसाहतीनजीक रवीभाई पटेल यांच्या घरी राहणाऱया प्रीती हरेश पटेल (34) या विवाहितेने विभक्त राहण्यास देत नसल्याच्या रागातून ओढणीने गळफास घेवून 31 जानेवारी रोजी दुपारी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर प्रीती यांचा भाऊ महेश धर्माची चव्हाण (31 शिरशी, कर्नाटक) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
महेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पार्वती ऊर्फ प्रीती हिचा पती, सासू-सासरे, दिर व जाऊ यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तिला अनेक वर्षे स्वतंत्र संसार करण्यास परवानगी देतो असे सांगून प्रत्यक्षात स्वतंत्र संसार करू न देता तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. महेश यांच्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी प्रीतीचे पती हरीश, सासू, सासरे पुरुषोत्तम, विनोद व त्यांची पत्नी, अशोक व त्यांची पत्नी, राजेश व त्यांची पत्नी अशा पटेल कुटुंबातील एकूण 9 जणांविरोधात भा.द.वि. कलम 306, 498 (अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.