महाविकास आघाडीकडून काळ्या फिती बांधून पाठिंबा
प्रतिनिधी/ लांजा
लांजा तालुका व्यापारी संघटनेने नियोजित ‘भारत बंद’ला पाठिंबा नसल्याचे सोमवारी सायंकाळी समाजमाध्यमाद्वारे जाहीर केले होते. त्यामुळे मंगळवारी तालुक्याचा आठवडा बाजार पूर्णपणे भरला होता. मात्र महाविकास आघाडीकडून काळ्या फिती बांधून बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला.
लांजा व्यापारी संघटनेने सोशल मीडियावर जाहीर पत्रकाद्वारे ‘बंद’ला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते. ग्रामीण भागात मात्र या बाबत संभ्रम होता. व्यापारी संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे मंगळवारी बाजार नेहमीप्रमाणे भरला. कोरोनामुळे कित्येक महिने दुकाने बंद होती. मंगळवारी आठवडा बाजार असताना ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. आठवडा बाजारात परजिह्यातील व्यापारी नेहमीप्रमाणे दाखल झाले होते. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिवसभर पोलिसांची गस्त सुरु होती.
लांजात महाविकास आघाडीच्यावतीने भारत बंदला पाठिंबा दर्शवत आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत व्यापाऱयांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी काळ्या फिती लावून लांजा बाजारपेठेत व्यापाऱयांना बंदमध्ये सहभागी हेण्याची विनंती केली. याप्रसंगी जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, तालुकाप्रमुख संदीप दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष नुरूदिन सय्यद, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल चे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, सभापती लीलाताई घडशी, उपसभापती दीपाली साळवी, लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, मनोहर सप्रे, संजय आयरे, चेतन खंदारे, राष्ट्रवादीचे अभिराजे शिर्के, नगरसेवक स्वरूप गुरव, नंदराज कुरूप, राजू हळदणकर, उपतालुका युवाधिकारी प्रसाद माने, प्रसाद भाईशेटय़े, वैभव जोईल, बापू लांजेकर, राहुल शिंदे, महिला शहर संघटक छाया गांगण आदी उपस्थित होते.









