प्रतिनिधी / लांजा
शहराच्या मध्यातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने सध्या वेग घेतला आहे. शहरातून गेलेल्या महामार्गात उड्डाण पुलाच्या पिलरसाठी 12 फुट उंच खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकाम केलेल्या खड्डय़ामध्ये शुक्रवारी एक गाय पडल्याची घटना घडली. या गाईला अर्ध्या तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
लांजा शहरात उनाड गुरांचा उपद्रव सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. उनाड गुरांमुळे अपघातही घडत आहेत. दरम्यान लांजा शहरात श्वान आणि उनाड गुरे यांचा त्रास महामार्गाच्या कामालाही होऊ लागला आहे. लांजा नगर पंचायतीसमोर महामार्गाच्या पिलरच्या खांबासाठी खोदाई सुरू आहे. शुक्रवारी याच खोदलेल्या उंच खड्डय़ामध्ये एक उनाड गाय पडल्याची घटना घडली. गाय खड्डय़ातील सिमेंट पिलरच्या लोखंडी रॉडवर न पडल्याने बालंबाल बचावली. महामार्गावर काम करणाऱया कामगारांना खड्डय़ात गाय पडल्याचे दिसले. शेजारीच काम सुरू असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने गायीला अर्ध्या तासात बाहेर काढण्यात आले. लांजा शहरात महामार्गाचे खोदकाम सुरू असून खोदाई कामाच्या ठिकाणी चारही बाजूने लोखंडी पत्रे लावून बंदीस्त केले आहे. मात्र उनाड गुरे कामाच्या ठिकाणी शिरकाव करत असल्याने अडथळा निर्माण होत आहे.
..









