प्रतिनिधी/ सातारा
पूर्वी दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना हंडाभर पाण्यासाठी नागरिक रात्र-रात्र जागरण करत असायचे. तशीच काहीशी परिस्थिती आता लस मिळविण्याकरीता झाली आहे. कारण लसीचा तुटवडा असल्याने नागरिक लसीकरण केंद्राबाहेर आपल्याला लस मिळावी याकरीता संपुर्ण रात्रच लसीकरण केंद्राबाहेर जागून रात्र घालवत आहेत. एवढे करुनही सकाळी किती जणांना लस देण्यात येणार आहे. याची काहीही माहिती नसते. सकाळी 7 वाजता टोकण वाटप करण्यात येते. जेवढी लस आलेली आहे तितकी टोकण वाटली जातात. बाकींच्याना नुसतीच रात्र जागून काढावी लागत आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. एवढय़ाने थांबत नाही. टोकण जरी मिळाले असले तरी लस मिळायला सुरुवात होते ती सकाळी 10.30 नंतर. म्हणजे लसीकरण अधिकारी, कर्मचारी निवांत झोप घेऊन येतात पण लसीसाठी कासावीस झालेल्यांना मात्र मच्छरांचा त्रास सहन करत रात्र जागून काढावी लागतेय.
मागील काही दिवसांपासून 18 वयोगटाच्या पुढील सर्वच नागरिकांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सर्वांनाच लसीकरणाचे महत्व पटल्यामुळे संबंधित वयोगटातील सर्वच नागरिक लसीकरणाकरीता उत्सुक झाले आहे. पण लसच उपलब्ध होत नसल्याने चक्क रात्री 11 वाजल्यापासुन सिव्हील हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्राबाहेर रांगा लवण्यात येत आहे. यामध्ये पुरूषांबरोबरच महिलांचाही तितकाच सहभाग आहे.
त्यामुळे कित्येक नागरिकांना संपुर्ण रात्र लसीकरण संबंधीचे टोकन मिळेपर्यंत लसीकरण केंद्राबाहेर काढावी लागत आहे. यामुळे सिव्हील हॉस्पिटल येथील लसीकरण केंदासमोर तर चक्क रात्रीच्या वेळी नागरिक लसीकरण करून घेण्याकरीता रांगेत उभे असलेले दिसत आहेत. दिवसागणिक लसीकरणाचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात असल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस येत आहे.
त्यातच कोणी मध्येच रागेत शिरेल किंवा टोकन मिळवुन घेईल की काय? याकरीता रात्रभर रांगेत उभे असलेले नागरिक डोळय़ात तेल घालुन संपुर्ण रात्र ही केंद्राबाहेर घालवत आहेत. त्यानंतर सकाळी 7 च्या सुमारास या नागरिकांना टोकन देण्यात येते. आणि 10.30 ते 11 च्या सुमारास लसीकरणास सुरूवात होते. यातच काही लसींचा दुसरा डोस असतो, तर काही लसी या परदेशी जाणाऱया नागरिकांसाठी राखिव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मोजक्याच लसी या सातारकरांच्या पदरात पडत आहेत. यामुळे कित्येक नागरिकांनी तर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संपुर्ण रात्रच केंद्राबाहेर
एकदाशी लस मिळुदे या भावनेतुन सातारकर लसीकरण केंद्राबाहेरच संपुर्ण रात्र घालवत आहेत. काहींनी तर बस्कर आणुन केंद्राबाहेरील रांगेत संपुर्ण रात्रभर ठाण मांडुन बसलेले नागरिक दिसत आहेत. यातच रात्रीच्या वेळी डास, विविध किडे, मुग्या यांचा सामना करत रात्र घालवावी लागत आहे.
खटाटोप करून ही पदरी निराशाच
कित्येक नागरिकांना तर रांगेत उभारून इतका सारा खटाटोप करून दुसऱया दिवशी लसच अपुरी असल्याचे समजता पदरी निराशाच मिळत आहे. काही नागरिक तर अगदी पहाटेच्या सुमारास लसीकरणाकरीता जात आहेत, पण प्रत्यक्ष केंद्राबाहेर लसीकरणाकरीता रात्रभर लागलेली रांग पाहुन त्यांना पदरी निराशाच घेऊन माघारी फिरावे लागत आहे.









